भाग १
चांगली आठवडाभर सुट्टी काढून फिरायला जाणार कुठे तर भूतानला! हे सांगितल्यावर मिळणार्या प्रतिक्रिया फारच मजेशीर होत्या. एकतर आधी भूतान हा वेगळा देश आहे हेच अनेकांच्या गावी नव्हतं. त्यात ते कुठे आहे, तिथे बघायला काय आहे वगैरेची माहिती असणं तसं दुर्मिळ होतं. काहींनी भूतान ऐकलं होतं मात्र ते शहर आहे, राज्य आहे की देश याबद्दल ते साशंक होते. काहींच्या ज्ञानाची व्याप्ती भूतान कुठे आहे, काय आहे वगैरे पर्यंत होती पण त्याच बरोबर तिथे 'काळी विद्या' बाळगणारे लोक आहेत अशासारखे गैरसमज बाळगून होते. थोडक्यात काय तर या सगळ्या नसलेल्या किंवा चुकीच्या मिळणार्या माहितीमधून आपल्याला हवी ती माहिती काढून भूतानच्या सहलीची आखणी करणं हे सुरवातीला दिव्य वाटलं होतं.
पुढचे वर्णन लिहिण्याआधी भूतानची थोडक्यात ओळख करून देतो. भूतान हे भारताच्या उत्तरपूर्व सीमेवरचे स्वतंत्र राष्ट्र. कोणताही समुद्रकिनारा नसणाऱ्या या देशाचे केवळ दोन शेजारी आहेत. पश्चिम, दक्षिण आणि पूर्वेला भारत आणि उत्तरेला चीन. चीन आणि भूतानच्या मध्ये हिमालयाची अत्यंत उंच आणि दुर्गम पर्वत-शिखरे- आहेत. त्यामुळे भूतानचा स्वाभाविक शेजारी भारत आहे. किंबहुना भारतीय उपखंडातील भारताशी कमीतकमी वाद असलेला हा भारताचा चांगला (व एकमेव? ) मित्रदेश म्हणता याव
तर, नेहमी प्रमाणे जालम् सर्वार्थ साधनम् या न्यायाने जालावर भूतानची माहिती शोधू लागलो आणि गोंधळात अधिकच भर पडली. बऱ्याचशा संकेतस्थळांवर भूतानमध्ये जाणे सुरक्षित आहे, सुंदर आहे असे दिले असले तरी तिथे किंमती अतिशय अधिक आहेत हे ही प्रत्येक जण नमूद करत होता. शिवाय तिथे जायचा परवाना कोठून मिळवायचा याबद्दल भूतानच्या ऑफिशियल स्थळावरही थोडी गोंधळात टाकणारी माहिती होती. पुढे थेट भूतान एम्बसीला इमेल लिहून अनेक गोष्टींचे निरसन करून घेतले. माहिती हाती लागली ती अशी:
- भूतानमध्ये काही सार्क राष्ट्रे सोडून इतर राष्ट्रातील नागरिकांना स्वतंत्र विजा काढणे बंधनकारक आहे.
- भारतीय नागरिकांना पारपत्राची (पासपोर्ट) गरज नसून केवळ मतदान ओळखपत्रावरही हा परवाना मिळू शकतो
- भूतान मुक्त पर्यटनाला व बॅगपॅकर्सना पाठिंबा/मान्यता देत नाही. तिथे कार्यक्रम पूर्वनियोजित असणे गरजेचे (बंधनकारक) आहे. त्याचबरोबर त्या कार्यक्रमानुसार प्रत्येक जिल्हा व काही महत्त्वाच्या खिंडींसाठी स्वतंत्र परवाना मिळवणे गरजेचे आहे जो सगळ्या जिल्ह्यांच्या डीझाँग मध्ये(जुने महाल व आताची सरकारी हाफिसे) मिळू शकतो
- भूतानमध्ये धर्म आणि शांतता यांना अजोड महत्त्व आहे. काही वास्तूंमध्ये पुरुषांना संपूर्ण शरीर(पूर्ण हात-पाय देखील)झाकलेली वस्त्रे व स्त्रियांना अश्या वस्त्रांबरोबर केस झाकणारे वस्त्रही असणे बंधनकारक आहे
- भूतानमध्ये भारतीय नागरिकांना वाटाड्या घेणे बंधनकारक नाही (मात्र सोयीचे आणि प्रसंगी गरजेचे आहे). भारतीय नागरिक नसलेल्या व्यक्तींबरोबर भूतानमधील स्थानिक वाटाड्या असणे बंधनकारक आहे
- भूतानमध्ये भारतीय नागरिकांना प्रवेश व निर्गमनाच्या वाटेवर बंधन नाही. मात्र भारतीय नागरिक नसलेल्या व्यक्तींनी किमान प्रवेश अथवा निर्गमन विमानमार्गाने करणे बंधनकारक आहे.
- भूतानमध्ये भारतीय नागरिकांना अन्य कोणताही कर नाही. मात्र भारतीय नागरिक नसलेल्या व्यक्तींसाठी दररोज (प्रत्येक निवासी-रात्रीसाठी) $२०० भरणे बंधनकारक आहे.
याशिवाय जालावर अशी अनेक प्रकारची माहिती मिळत होती ती वाचून तिथे जाण्याची इच्छा आणि त्या देशाबद्दलची उत्सुकता अधिकच चाळवली. देशाची दुर्गमता आणि अनेक परवान्यांची गरज बघून शेवटी ठाण्यातील एका एजंटद्वारे भूतानमध्ये चक्क मराठी बोलणारा स्थानिक गाईड कम ड्रायव्हर पटकावला. त्याने योग्य ते परवाने मिळवून ठेवले, हॉटेले रिझर्व करून ठेवली (भूतानमधील हॉटेले जालावरून / फोनवरून बुकिंग स्वीकारत नाहीत. स्थानिक एजंटतर्फेच जाणे बंधनकारक आहे). काही दिवसांत सगळीकडून आलबेल मिळाला आणि आम्ही भूतानकडे प्रयाण करण्यास सज्ज झालो.
मुंबईहून उडत कोलकाता व तेथून उडत बागडोगरा येथे गेलो. बागडोगरा हे पश्चिम बंगालमधील उत्तरेकडचे एकमेव विमानतळ. इथून सिक्कीम, दार्जिलिंग वगैरे ठिकाणी जाण्यासाठी पर्यटक येतात. आमचे लक्ष्य मात्र वेगळे होते. आम्हाला घ्यायला आलेल्या 'सलीम'ला ठरल्यावेळेवर, ठरल्याठिकाणी भेटल्यावर सहलीची सुरुवात तर चांगली झाली असे प्रत्येकाने बोलून घेतले. सलीम मूळचा पुण्याचा. अजूनही पावसाळ्यात - ऑफ सीझनला- तो पुण्यातील आपल्या कुटुंबीयांकडे येतो. मराठी संगीताची आवड असल्याने त्याने गाडी सुरू होताच "माझ्याकडे चाळीसेक जीबी गाणी आहेत तुम्हाला काय ऐकायचंय ते सांगा" म्हटल्यावर आम्ही (हिमालयात शिरण्याआधीच) गार पडलो. या रसिकाकडे काय नव्हतं? नाट्यसंगीत, सुगमसंगीत, भावगीते, भक्तिगीते, कोळीगीते, बालगीते, शास्त्रीय संगीत, नवीन कलाकारांचे संगीत.. तुम्ही फक्त नाव घ्या अशी परिस्थिती होती.
दुतर्फा डोळ्याचे पारणे फेडणारी हिरवीकंच बंगाली गावे, स्वच्छ हवा, मोकळा श्वास, सहलीच्या सुरवातीला असलेला उत्साह आणि सोबत नाट्यसंगीत यांच्या प्रसन्न मिलाफाने चारेक तासांचा प्रवास कधी संपला कळलेही नाही. 'जयगाव' हे भारतातील शेवटचं गाव आलं. समोर "भूतानच्या 'रॉयल किंगडम' मध्ये स्वागत आहे" असे विशद करणारी, अत्यंत सुंदर चित्रांनी रेखलेली कमान आली. कमानीखाली भूतानचे पोलिस उभे होते. भारतीय नागरिकांसाठी सीमा खुली असल्याने कोणत्याही दस्तऐवज न दाखवता (दुसऱ्या दिवशी ऑफिसे उघडल्यावर दाखवावी लागतात) आम्ही त्या कमानी खालून भूतानमध्ये प्रवेश केला:
फुट्शोलिंग / फुत्शोलिंगः
भूतानचा राजा
गाडीची चाके १८० अंशात फिरली असतील आणि भोवतालचा परिसर ३६० अंशात फिरला. रस्ता मोकळा झाला, इमारती सुबक झाल्या, रस्ते अचानक खड्डेमुक्त झाले, नदीचं पाणी वाहतं झालं आणि सर्वत्र स्वच्छता जाणवू लागली. स्वच्छता ही जागतिक सवय असून केवळ भारत त्याला अपवाद आहे की काय असे आता वाटू लागले आहे. केवळ एका कमानीमधून जाताच स्वच्छतेमध्ये कमालीचा फरक होता. अंधार पडू लागला होता. थेट हॉटेलवर गेलो. अत्यंत स्वच्छ हॉटेल, टुमदार इमारत, प्रसन्न रंग. खोल्या ताब्यात घेतल्या. जरा फ्रेश होईतो आमचा गाईड-कम-ड्रायव्हर-कम-व्यवस्थापक सलीम अवतरला.
"जेवायला काय हवंय? " समोर मेन्यूकार्ड नाचवत त्याने विचारलं.
कार्डावर तरी अनेक पंजाबी पदार्थांची यादी होती. त्यामुळे बर्याचजणांचा जीव भांड्यात पडला. भूतानमध्ये खायला फारसं मिळत नाही हा एक (गैर?)समज सगळे (माझ्यासकट) बाळगून होते. त्यामुळे मी सगळ्यांना भरपूर पदार्थ बरोबर घ्यायला लावले होते. प्रत्येकाने ती पदार्थांची यादी बघून आधी माझ्याकडे आणि मग त्या पदार्थांकडे मोर्चा वळवला. प्रत्यक्ष जेवण आल्यावर मात्र इथे सारे पदार्थ मोहरीच्या तेलात केलेले होते. त्याला एक वेगळा असा वास होता. काहींना तो आवडला तर काहींना तो जमेना.
जेवणं चालू असताना एकीकडे सलीम माहिती देत होता.
"हे जे फुटशोलिंग आहे ते भूतानच्या दोन प्रवेशद्वारांपैकी एक. भूतानचे कदाचित एकमेव 'आधुनिक' किंवा 'भारतासारखे' शहर. भारताला लागून असल्याने इथे तशी अस्वच्छता, गर्दी, दुकाने वगैरे दिसतील. " (यापैकी काहीही न जाणवल्याने किंबहुना हा भाग अगदीच स्वच्छ, मोकळा वाटल्याने आम्ही जरा चकित झालो. तसंही त्या जयगाव मधून आल्यावर बहुदा धारावीही टापटीप वाटली असती.)
"तुम्हाला आता कदाचित पटणार नाही, मात्र परतताना आपण याच शहरातून जाणार आहोत. तेव्हा तुम्ही मला सांगा की फुटशोलिंग तुम्हाला कसं वाटतंय ते. तर हे प्रवेशद्वार. इथे बघायला विशेष काही नाही. प्रवेशाचे शहर असल्याने बऱ्याच सरकारी इमारती, हाफिसे वगैरे आहेत. आपले प्रवेश-परवाने तयार गोळा करून उद्या निघू.. उद्या ५-६ तासांचा प्रवास आहे आपण थिंफूला पोहचू. "
"इथे वेगळं चलन आहे ना? "
"हो. गुल्ट्रम म्हणतात. १ गुल्ट्रम = १ रुपया असं आपलं चलन यांनीच भारताशी बांधून घेतलं आहे. तुम्हाला आधी सांगितलं तसं भारताचं चलनही इथे सगळीकडे सर्रास चालतं. फक्त १००० आणि ५०० च्या नोटा चालत नाहीत. "
"इथे आता लोकशाही आहे ना? "
"होय. २००३ मध्ये पहिल्या निवडणुका झाल्या. मात्र जेव्हा राजाने लोकशाहीची घोषणा केली होती तेव्हा लोकांनी स्वयंस्फूर्त आंदोलन केलं होतं. त्यांचं राजावर आणि राजघराण्यावर प्रचंड प्रेम! "
"होय खाली रिसेप्शनमध्ये सुद्धा त्याचा फोटो दिसला."
Gross National Happiness
आता तुम्हाला सगळीकडे तोच दिसणार आहे. लोकांना तो इतका आवडतो त्याचं कारण त्यानेही अनेक गोष्टी केल्या आहेत. तो भूतानच्या संस्कृतीला सर्वात अधिक प्राधान्य देतो. जीडीपी हे प्रगती मोजण्याचं साधन न समजता ग्रॉस नॅशनल हॅपीनेस (जीएनएच) हे एकक तो मोजतो. श्रीमंत असण्यापेक्षा आनंदी असणं हे अधिक महत्त्वाचं ही तिबेटी शिकवण त्याने नव्या जगाला समजेल अश्या प्रकाराने मांडली आहे. हा फोटो बघा, थिंफुच्या 'ट्रॅडिशनल आर्ट स्कूल' मध्ये लिहिलेलं वाक्य हेच सांगतं. या आधीच्या राजाने भूतानचा चेहरा बदलायला सुरुवात केली आणि हा पाचवा राजा नव्या जगाशी समरसूनही स्वतःचे वेगळेपण जपत जपत बदल घडवतो आहे. "
"मग भूतानला घटनाही असेल?"
"हो तर! आहेच. घटनेनुसार राजा हा देशाचा पदसिद्ध अध्यक्ष आहे. मात्र तिबेटी परंपरा त्याहीपेक्षा उच्च समजली आहे. परंपरेला, शांततेला, पर्यावरणाला धक्का बसेल असे निर्णय घेणे राजालाही कठीण आहे. "
१ | २