एक आनंदप्रिय, शांत देश : भूतान - २

ऋषिकेश

भाग २


थिंफू शहर

पुढील प्रवासात राजाने जे नियम केले आहेत ते बघता त्याच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटले. भूतानबाहेर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीस भूतानचे नागरिकत्व मिळू शकत नाही. अशी कोणतीही व्यक्ती भूतानमध्ये स्थावर मालमत्ता विकत घेऊ शकत नाही. नागरिकत्व हवे असेल एक तर भूतानमध्ये जन्म घ्या नाहीतर भूतानी व्यक्तीशी लग्न करा आणि भूतानमध्येच स्थायिक व्हा. भूतानमधील कायदे असे आहेत की जनता पैशाच्या मागे न लागता साध्या राहणीकडे तोचा ओढा असावा. प्रत्येक गावात 'शॉपिंग' सेंटर्स सोडा साधी चांगली दुकाने मिळणे मुष्किल आहे. जी आहेत ती प्रचंड महाग आहेत! भूतानमधून आठवण म्हणून काही घेऊन यायचे असेल तर खिसा चांगलाच गरम पाहिजे. थोडक्यात काय तर, एका ठराविक आर्थिक स्तरापेक्षा वरच्या लोकांनाच (जे तुलनेने गदारोळ घालणार नाहीत, अशांतता माजवणार नाहीत - असे त्यांचे मत) भूतान खुला आहे. (अपवाद: भारतीय नागरिक)

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कचेर्‍या उघडल्यावर परवाने हाती पडले आणि थिंफूला जायला निघालो. फुटशोलिंग मागे (खरंतर खाली) पडत चालले आणि गाडी पुढे म्हणजे वर वर जाऊ लागली. फुटशोलिंगला असताना जी सपाट जमीन बघितली ती पुढल्या ८ दिवसांतील शेवटची सपाटी होती. यापुढील दिवस आम्ही केवळ आणि केवळ घाटात होतो. आणि तेही साधेसुधे घाट नव्हेत तर हिमालयीन घाट. इथे २०० मीटरचा रस्ताही सरळ नव्हता, एका बाजूला नजर ठरेपर्यंत उंच पहाड आणि दुसर्‍या बाजूला जमीन दिसण्याचा भास होतोय न होतोय इतक्या खोल दर्या. येथील दोन शहरांना जोडणारे बरेचसे रस्ते भारतीय सैन्याने तयार केले आहेत. या रस्त्यांना 'दन्ताक' रस्ते म्हणतात. (भूतानच्या राजाचे स्वत:चे सैनिक असले तरी भारतीय सैन्यच त्यांच्या सीमांचे रक्षण करते). इतक्या दुर्गम आणि दुर्लभ वातावरणात, उंचीवर - प्रदेशात इतके उत्तम रस्ते बांधणाऱ्या भारतीय सैन्याचे कौतुक करावे तितके कमी आहे.

थिंफू --> पुनाखा --> पारो असा प्रवास करून आम्ही पुन्हा फुटशोलिंग असा प्रवास केला होता. विस्तार भयास्तव या स्थळांविषयी थोडक्यात लिहितो:

थिंफू:


दोचू ला खिंड

अतिशय मोहक इमारती, स्वच्छ नदीचे पात्र, एका डोंगरावर दिसणारा बुद्धाचा भलामोठा पुतळा या गोष्टी शहरात शिरताच नजरेत भरल्या. थिंफू येथे 'राजाचा महाल' (दूरून), सिटी व्ह्यू पॉंईंट, टकीन झु, एक नेपाळी पद्धतीचा पॅगोडा आणि भल्यामोठ्या आकारातील बुद्धमूर्ती (अद्याप बांधकाम चालू आहे) वगैरे गोष्टी बघण्यासारख्या आहेत. तिबेटी पारंपरिक घरांची रचना दाखवणारे एक छोटे घर त्यांनी टिकवले आहे व ते घर हेच प्रदर्शन आहे. तिमजली घरात, एका मजल्यावर केवळ गोठा, बाळंतिणीची खोली आणि अवजारे ठेवायची खोली, पहिल्या मजल्यावर राहायची - झोपायची-जेवायची जागा आणि धान्याची कोठारे, कणग्या आणि वरच्या मजल्यावर बैठकीची खोली व बहुतांश लोकांना प्रवेश निषिद्ध असलेली देवालयाची खोली अशी ढोबळ रचना सांगता यावी.

दोचू ला, पुनाखा:

तिबेटी भाषेत 'ला' म्हणजे 'खिंड'. पुनाखा या सुंदर व पुरातन तिबेटी मठ व प्रशासकीय केंद्राला भेट देताना मध्ये दोचू ला लागते. इथे अनेक स्तूपाच्या रूपातली अनेक स्मरण स्थळे -स्मारके दिसतात. एक भारतीय म्हणून हे स्थळ महत्त्वाचे आहे कारण २००४ मध्ये या स्थळाचा विकास झाला. भारतातील काही आतंकवादी भूतानमध्ये लपले होते. त्यांना भूतानचे नेस्तनाबूत केल्याचे प्रतीक म्हणून हे स्तूप उभारले आहेत. या स्तूपांची रचना व स्थळ दोन्ही सुंदर आहे. इथून हिमालयाची हिमाच्छादित शिखरांची रांग दिसते.


पुनाखा

पुनाखा

हे अत्यंत सुंदर असे प्रार्थनास्थान, मठ व प्रशासकीय केंद्र आहे. दोन नद्यांच्या संगमावरची मुख्य इमारत स्थापत्य, कला, सौंदर्य,आदी अनेक बाबतीत उजवी आहे. भोवतालचा घाऊक जॅकरॅंडा व त्याचा सुंदर जांभळा रंग त्या इमारतीला वेगळेच देखणेपण देतो. अजिबात चुकवू नये असे स्थान.

पारो:


पारो विमानतळ

ही भूतानची पुरातन राजधानी. इथे भूतानमधील 'एकमेव' विमानतळ आहे. पारो हे शहर बघण्यासारखे आहे. इथे त्यातल्या त्यात शॉपिंग करता येईल अशी काही दुकाने आहेत (फार अपेक्षा ठेवू नका, किंमती प्रचंड आहेत.) पारो शहरातील किल्ला, विमानतळ, म्युझियम वगैरे गोष्टी या प्रेक्षणीय आहेत. त्यातही टेकऑफ व लँडींग करणारे विमान ही खास बघण्यासारखी घटना आहे. अनेक डोंगरामध्ये कशाबशा बांधलेल्या या विमानतळावर विमान वळणे घेत घेत लँड होते तेव्हा चाके टेकल्यावर वैमानिकच काय पण प्रेक्षकही हुश्श! करतात.

पारोजवळ टायगर्स नेस्ट मॉनेस्ट्री नावाच्या बौद्ध-तिबेटी प्रार्थना मंदिराचा एक दिवसाचा ट्रेक प्रचंड सुंदर आहे. उप-हिमालयातील वेगळ्या प्रकारचा डोंगर, हिरवीगर्द झाडे, खळाळते झरे, मोकळी हवा, क्षितिजावर आकाशाला भिडणारी हिमाच्छादित शिखरे व एका कड्याच्या टोकावर तयार केलेली मॉनेस्ट्री सगळा थकवा पळवण्यास उपयुक्त आहे. ट्रेक सोपा आहे फक्त जरा लांब आहे. (आमच्या सोबतच्या ६०-६१ वर्षाच्या आसपासच्या ३ व्यक्तींनी ट्रेक पूर्ण केला.)

कला:

भूतानची वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला ही देखील एक अभ्यासण्याजोगी गोष्ट आहे. अनेक परदेशी पर्यटक ही चित्रकला शिकण्यासाठी तिथे येतात. याशिवाय लोकरीची, रेशमाची वस्त्रे बनविण्याची कला तर घरोघरी दिसली. अनेक घरांपुढल्या ओसरीवर स्त्रिया हातमागावर अतिशय सुंदर मफलर, शाली विणताना दिसल्या. अधिक चौकशीअंती कळले की या स्त्रिया हिवाळ्यात पुढील वर्षाचे कपडेही घरी बसल्या-बसल्या विणून टाकतात.

फुले-फळे-पक्षी


टायगर्स नेस्ट मॉनेस्ट्री

घरगुती विणकाम

हिमालयातील फुलांच्या वैशिष्ट्याला जागून या प्रदूषणमुक्त देशांत फुलांचे रंग व त्यांचे आकार या चकित करणाऱ्या गोष्टी आहेत. दोन्ही हातात न मावणारे व अनेक रंगात फुललेले गुलाब तर खास तिथेच जाऊन बघावेत. साध्या रानफुलांचे इतके रंग व रंगछटा क्वचितच कुठे दिसत असतील. सफरचंद, अक्रोड वगैरे फळे विकायला दिसली. बाकी असल्यास कल्पना नाही. पक्ष्यांमध्ये धनेश, अत्यंत रुबाबदार हिमालयीन घार, भारद्वाज, सुतार पक्षी अनेकदा दिसले. टायगर्स नेस्ट च्या ट्रेकला तर अनेक अनोळखी सुंदर पक्षी दिसले. आपल्याकडे साळुंक्या फिराव्यात तश्या संख्येने नदीकाठच्या वाळवंटात घरटे करणारे (बरेचसे दयाळासारखे दिसणारे) धोबी-धोबीण पारोला चिक्कार दिसले. थिंफूला अगदी हाकेच्या अंतरावर सुतार पक्षी व त्याचे घर(टे) दिसले.

खेळः

तिरंदाजी हा भूतानचा राष्ट्रीय खेळ. त्याची बरीचशी मोठाली स्टेडियम्स मात्र भूतानच्या पूर्व, उत्तर भागात आहेत. आम्हाला फक्त एकदा थिंफूला तिरंदाजीचे ओझरते दर्शन झाले. मात्र 'खुरू' हा नेमबाजीचा खेळ अनेक मैदानात खेळला जाताना दिसला. आमच्या हॉटेलजवळच्या मैदानातील मुलांनी तर आम्हालाही खेळायची संधी दिली. या खेळात मैदानाच्या दोन बाजूला दोन फळ्या / खोडे लावलेली असतात. आपल्याकडे डार्टचे लोखंडी (बरयापैकी वजनदार) खिळे - बाण असतात. ते जोरात फेकायचे. जर दुसरया बाजूच्या फळीला तो खिळा लागला तर बाकीच्यांनी खिळा लागणारयाला काही पैसे द्यायचे. सगळे व सगळ्यांचे खिळे फेकून झाले की दुसरया टोकाहून हाच खेळ परत. (दुर्दैवाने (अपेक्षेप्रमाणे) आमच्यापैकी कोणाचेही खिळे लक्ष्यवेध करू शकले नाहीत मात्र सुदैवाने (की मुद्दाम कोण जाणे) तेथील स्थानिकांचेही खिळे लक्ष्य भेदू शकले नाहीत. नो लॉस नो गेन)

समाजः

इथला समाज तसा लाजाळू मात्र सज्जन वाटला. सगळी प्रजा सुशिक्षित आहे. बरेच जण इंग्रजी उत्तम बोलतात. वाटेत त्यांची युनिव्हर्सिटी लागली होती. विद्यार्थी शिस्तीत व भडक वर्तन करणारे वाटले नाहीत. एक गंमत अशी की बर्‍याचशा कामांवर फक्त स्त्रियाच दिसतात. अगदी रस्त्याच्या कडेला चाललेल्या बांधकामावर कामे करणारयांची मुकादम स्त्री बघून एकदम नवे दृश्य बघितल्यासारखे वाटते. हॉटेलांमध्ये तर सगळे स्त्री राज्य. आमच्या जड ब्यागा कार वरून उतरवण्यापासून ते जेवायला वाढण्यापर्यंत कामे त्याच करत. एका बंगाली ग्रुपने भूतानी स्थानिक गाण्यावर त्यांना स्थानिक नृत्य करायला सांगितल्यावर त्यांनी आढेवेढे न घेता पाहुण्यांची ही इच्छाही पूर्ण केली.
थोडक्यात सांगायचं तर नवी संस्कृती, नव्या पद्धती, नवे विचार, नवे आचार (आणि नवीनतम गाड्या) बघायला आवडत असेल, आणि 'पर्यटनस्थळे' बघणे, खरेदी करणे, उत्तमोत्तम स्थानिक जेवणाचा आनंद घेणे, जमिनीवरचा प्रवास टाळणे (इथे गाडी लागणे अगदी स्वाभाविक आहे) हे सारे नसल्यास चालणार असेल तर भूतान हा पर्यटनासाठी वेगळा पर्याय ठरावा.

समाप्त.

| २