आर्यभटाची अक्षरचिन्हे

प्रमोद सहस्रबुद्धे

मखि भखि फखि धखि णखि ञखि
ङखि हस्झ स्ककि किष्ग श्घकि किध्व ।
घ्लकि किग्र हक्य धकि किच
स्ग श्झ ङ्व क्ल प्त फ छ कालर्धज्या ॥

आर्यभटीयातील हे बारावे कडवे. यातील बहुतेक शब्द आकड्यांसाठी अक्षर या संकल्पनेतून आलेले आहेत. आर्यभटीयात या पद्धतीचा अवलंब केला आहे. पाठ करण्यास सोपी (आकडे पाठ करण्याऐवजी), लिहिण्यास कमी जागा लागणे असा त्यातला फायदा आहे. रोमन आकडे ही अक्षरात लिहिले जातात. पण रोमन आकड्यात संख्या लिहिणे विशेषत: मोठ्या संख्या लिहिणे फारसे सोपे नाही. आर्यभटाची पद्धत मात्र देवनागरी लिपीचा पुरेपूर वापर करणारी असल्याने, मोठे आकडे लिहिणे सोपे जाते.

क... च.... ट.... प.... त... असे पाच व्यंजनांचे पाच गट आहेत. या पंचवीस व्यंजनांना वर्ग व्यंजने तर य ते ह या व्यजनांना अवर्ग व्यंजने म्हणायचे. या प्रत्येक अक्षराला एक किंमत दिली आहे, ती खालिल प्रमाणे.

क=1 ख=2 ग=3 घ=4 ङ=5
च=6 छ=7 ज=8 झ=9 ञ=10
ट=11 ठ=12 ड=13 ढ=14 ण=15
त=16 थ=17 द=18 ध=19 न=20
प=21 फ=22 ब=23 भ=24 म=25
य=30 र=40 ल=50 व=60 श=70 ष=80 स=90 ह=100

पहिल्यांदा वरील सूचीचा परिणाम बघुया. वर्ग आणि अवर्ग व्यंजनांच्या संधीमुळे 1 ते 100 आकडी संख्या लिहिता येते. उदा. 23= ब. 37= य्छ, 88= ष्ज. अर्थात हेच यछ वा षज असे लिहिले तरी चालते. एवढेच नाही तर 47 हा आकडा आपण यथ वा रछ असाही लिहू शकतो एकच आकडा वेगवेगळ्या अक्षरात लिहिता येत असल्याने कधी सोपी अक्षरे निवडता येतील. जोडाक्षरांऐवजी सुटी अक्षरे ही लिहिता येतात. बरेचदा जोडाक्षर वापरलेले दिसते.

व्यंजनांबरोबर स्वराचा संगम होऊन देवनागरीतले (आणि तत्सम लिपीतले) एक अक्षर बनते. या स्वरांना अंकातील स्थान दिले तर मोठे आकडे लिहिता येतील. आर्यभटाने हेच केले. ही स्थाने एकंदर 9 आहेत.

अ आ साठी पहिले (म्हणजे 1), इ ई साठी 3रे (100), उ ऊ साठी 5वे(10000),, ऋ साठी 7वे, लृ साठी 9, ए साठी 11वे., ओ साठी 13वे, ऐ साठी 15वे. आणि औ साठी 17वे. र्‍हस्व आणि दीर्घ उच्चारात गोंधळ होऊ नये म्हणून त्यांची स्थाने वगळली आहेत. व्यंजनांमध्ये एक ते शंभर आकडे लिहिता येत असल्याने स्वरांच्या स्थानासाठी दोन दोन स्थानांची निवड केली आहे. (पहिले तिसरे पाचवे अशी.) अ=1 इ=100 असे बघितले तर हा प्रत्येक आकडा वर्ग आकडा आहे. यरलवशषसह ही अक्षरे दोन आकडी असल्याने त्यांचे स्थान अवर्गात जाते. (10,1000 इत्यादीत.) आर्यभटाने म्हणून त्यांना अवर्ग व्यंजने असे नाव दिले आहे. (पण हे नाव मला तितकेसे पटलेले नाही. ट पासूनची व्यंजनातील एक भाग अवर्गात आणि एक भाग वर्गात मोडतो. ) व्यंजनांच्या जोडीला अ-औ स्वर जोडल्यास 18 आकडी संख्या लिहिता येईल.

कि = 100 खि म्हणजे 200

पहिल्या श्लोकात मखि आहे मखि = 225, भखि = 224, फखि=222 धखि=219 असे ते आकडे होतात.

आपल्या नावातूनही आकडे शोधता येतील प्रमोद = (21+40)+(25 गुणिले 100,00,00,00,00,00)+18 = 25,00,00,00,00,00,79 अशी संख्या होईल. अर्थात प्रमोद ही संख्या आर्यभटाने श्झमो अशी लिहिली असती. आर्यभट संख्या लिहिताना अक्षरे नेहमीपेक्षा उलट्या क्र्माने लिहिताना दिसतो. (असे करण्याची गरज नाही.) म्हणजे सर्वात शेवटी मोठे स्थान तर सुरुवातीला एकंस्थान.

अगदी सुलभ आकडा घेतला 123456789 तर शझलिचिरुङुबृक्लृ असा वा श्झल्चिर्डुबृक्लृ असा लिहिता येईल.

आर्यभटाने वापरलेले आक़डे

'ख्युघृ' आर्यभटाने वापरले आहे. ख=2 य=30 ख्यु म्हणजे 320000 घ म्हणजे 4 तर ऋ म्हणजे 1000000 तर घृ म्हणजे 4000000 तर ख्युघृ = 4320000.
चयगियिङुशुछ्लृ हे 57,75,33,36 (नेहमी प्रमाणे म्हणजे 5,77,53,336)
ङिशिवुण्लृष्खृ (हा आकडा थोडा उलट सुलट लिहिलेला दिसतो) म्हणजे 15,82,23,75,00 (दोन च्या गटात मुद्दाम दिलेले आहेत.)

अपूर्णाँक: दशांश चिन्हे देऊन अपूर्णांक लिहिले गेलेले नाहीत. त्या ऐवजी आर्यभट किती भागिले किती अशा पद्धतीने संख्या लिहितो. एका युगात ख्युघृ वर्षे असतात तर ङिशिवुण्लृष्खृ दिवस (सायडेरियल) असतात. यावरून आपण एका वर्षात 366.25868 सायडेरियल दिवस असतात (365.25868 दिवस) असतात असे म्हणू शकतो. (सायडेरियल म्हणजे तार्‍यांच्या सापेक्षतेने बघितलेले.) हाच आकडा सध्या
आपण 366.242199 असा धरतो.

गणितातील शून्याची संकल्पना आणि त्याचे चिन्ह जगाला मिळणे ही गणिताच्या इतिहासातील मोठी कल्पना आहे. आर्यभटाने ही संकल्पना आणली असे आर्यभटीयावरून सांगता येत नाही. पण त्याच्या अक्षर अंक पद्धतीत स्थानमूल्य आहे. त्या अक्षरांपासून अंक लिहित जात असावेत असेही दिसते. स्थान लिहिण्यामुळे पुढील शून्य लिहिण्याची गरज नाही. पण आकड्यात लिहिताना उरलेल्या रिकाम्या जागात शून्य लिहिण्याची पद्धत कदाचित या अक्षर अंक पद्धतीत आहे असे वाटते. यावरून असे वाटते की शून्याची कल्पना त्यावेळी ज्ञात होती. आणि कदाचित असे लिहिणारा हा पहिला लिखित पुरावा असल्याने आर्यभटाला दूरान्वयाने शून्य संकल्पनेच्या उद्गात्याशी जोडता येते.