दृष्टीचा डोळा पाहों गेलीये

नंदन

पहिल्या महायुद्धानंतर जे अनेक कलाकार सँटा फे परिसराकडे वळले, त्यांच्यात जॉर्जिया ओ'कीफ आणि अल्फ्रेड स्टिगलिझ ह्या दांपत्याचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. छायाचित्रण ही निव्वळ यांत्रिक करामत नसून, तीही एक कला आहे हा दृष्टिकोन यशस्वीपणे रूजवणारा आणि स्वतः उत्तम छायाचित्रकार असणारा स्टिगलिझ आणि विसाव्या शतकातल्या महत्त्वाच्या अमेरिकन चित्रकारांपैकी एक अशी जॉर्जिया ओ'कीफ ही दंपती त्यांच्या प्रतिभेमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहेच; मात्र त्याचबरोबर त्यांच्या उमेदीच्या काळात छायाचित्रकला आणि चित्रकला ह्यांच्यातील परस्परपूरकतेबद्दल आणि संघर्षाबद्दल जी चर्चा झाली आणि परिणामी दोन्ही क्षेत्रांत जे प्रयोग चोखाळले गेले, बदल घडले त्यांचा मागोवा घेणे हा रसिकांच्या अभ्यासाचा आणि आवडीचा विषय ठरला आहे.

 

सँटा फे हे अमेरिकेतल्या 'न्यू मेक्सिको' राज्याच्या राजधानीचं शहर. समुद्रसपाटीपासून सात हजार फुटांवर वसलेलं. जेमतेम साठ-पासष्ट हजार लोकवस्तीच्या ह्या शहरात वस्तु आणि शिल्प-संग्रहालयांची, उत्तम रेस्तराँची आणि ऐतिहासिक वास्तुंची रेलचेल आहे. स्थानिक प्वेब्लो अमेरिकन इंडियन जमात, कॅथलिक धर्म आणि मूर स्थापत्यशैली घेऊन आलेले स्पॅनिश आक्रमक आणि पुढे अमेरिकन सेटलर्स व नजीकच्या मेक्सिकोचा पडलेला प्रभाव; ह्यामुळे इ.स. १६०७ साली वसवल्या गेलेल्या ह्या शहराने बरीच स्थित्यंतरं पाहिली आहेत. असं असलं तरी, सभोवतालच्या निसर्गाचा आणि ह्या टुमदार शहरातील कलासक्त वातावरणाचा कलाकारांना सतत मोह पडत आलेला आहे.अडोबी शिल्पकलेचा नमुना

पहिल्या महायुद्धानंतर जे अनेक कलाकार सँटा फे परिसराकडे वळले, त्यांच्यात जॉर्जिया ओ'कीफ आणि अल्फ्रेड स्टिगलिझ ह्या दांपत्याचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. छायाचित्रण ही निव्वळ यांत्रिक करामत नसून, तीही एक कला आहे हा दृष्टिकोन यशस्वीपणे रूजवणारा आणि स्वतः उत्तम छायाचित्रकार असणारा स्टिगलिझ आणि विसाव्या शतकातल्या महत्त्वाच्या अमेरिकन चित्रकारांपैकी एक अशी जॉर्जिया ओ'कीफ ही दंपती त्यांच्या प्रतिभेमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहेच; मात्र त्याचबरोबर त्यांच्या उमेदीच्या काळात छायाचित्रकला आणि चित्रकला ह्यांच्यातील परस्परपूरकतेबद्दल आणि संघर्षाबद्दल जी चर्चा झाली आणि परिणामी दोन्ही क्षेत्रांत जे प्रयोग चोखाळले गेले, बदल घडले त्यांचा मागोवा घेणे हा रसिकांच्या अभ्यासाचा आणि आवडीचा विषय ठरला आहे. अलीकडेच सँटा फे शहरातल्या जॉर्जिया ओ'कीफ संग्रहालयात ह्याच विषयावरचे 'शेअर्ड इंटेलिजन्सः अमेरिकन पेंटिंग अँड द फोटोग्राफ' हे सुरेख प्रदर्शन पाहण्याचा योग आला. तेव्हा टिपलेल्या ह्या काही नोंदी -

व्हेनेशियन कनाल - अल्फ्रेड स्टिगलिझ

छायाचित्रणाचा शोध जरी १८२६ साली लागला असला, तरी ही कला लोकप्रिय होण्यात अजून काही दशकं जावी लागली. युरोपातल्या औद्योगिक क्रांतीचा परिणाम म्हणून त्याच सुमारास शहरी मध्यमवर्गाचा उदय होऊ लागला होता. हाती पैसा आल्यावर अभिजन वर्गाच्या चालीरीतींचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती सर्वच समाजांत दिसून येते. ह्याचा परिणाम म्हणून, राजेरजवाड्यांप्रमाणे आपली पोर्ट्रेट्स बनवून घ्यायची लाट मध्यमवर्गात आली. ह्या नवीन मागणीला तोंड देण्यास तैलरंगात, अनेक बैठकींत चित्र रेखाटणारे चित्रकार असमर्थ होते. मात्र तोपर्यंत छायाचित्रणाच्या तंत्रात झालेल्या दगेरोटाईपसारख्या अनेक सुधारणांनी मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने छायाचित्रे काढणे शक्य झाले होते. ह्या दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय, पण ह्याच सुमारास चित्रकारांना आश्रय देणार्‍या पारंपरिक राजघराण्यांचा अस्त होऊ लागला होता. १८८० च्या दशकात जॉर्ज इस्टमनच्या फोटोग्राफिक फिल्मच्या शोधाने आणि कोडॅक कॅमेर्‍यांच्या सहज उपलब्धतेमुळे छायाचित्रणाने चित्रकलेच्या एका भागावरचा कब्जा अधिक बळकट केला. मात्र हे आक्रमण निव्वळ पोर्ट्रेट्सपुरते मर्यादित नव्हते. वास्तववादी चित्रकलेवरही ह्याचा परिणाम झाला. जर हुबेहूब चित्रच रेखाटायचे असेल, तर अधिक खर्चिक आणि वेळखाऊ चित्रापेक्षा सोपे व स्वस्त छायाचित्र अधिक श्रेयस्कर हा सरळ हिशोब होता. मात्र ह्याचा दुसरा परिणाम असा झाला की, वास्तववादी चित्रांवर छायाचित्रांनी कुरघोडी केल्यामुळे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट किंवा अमूर्त शैलीकडे चित्रकलेचा प्रवास अधिक वेगाने झाला. निव्वळ हुबेहूब व्हायोलिन रेखाटण्यापेक्षा केवळ व्हायोलिन-पण दाखवून देणार्‍या मोजक्या फटकार्‍यांकडे काही चित्रकार वळू लागले. परिचित शब्दांमधली महत्त्वाची अक्षरे वगळता इतर कोणत्याही क्रमाने असली किंवा त्यांच्याऐवजी चक्क आकडे टाकलेले असले, तरीही आपला मेंदू ते शब्द बरोबर ओळखू शकतो; तसंच काहीसं. [उदा. TH15 M3554G3 53RV35 TO PR0V3 H0W 0UR M1ND5 C4N D0 4M4Z1NG TH1NG5! 1MPR3551V3 TH1NG5!]

व्हाईट फ्लॉवर- जॉर्जिया ओ'कीफ

याच सुमारास - म्हणजे एकोणिसावे शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत उदयाला आलेल्या 'इम्प्रेशनिझम' शैलीचा फार मोठा प्रभाव चित्रकार आणि छायाचित्रकारांवर पडला. पॅरिस हे ह्या नव्या बदलांचे केंद्र होते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या मूलभूत तत्त्वांवर श्रद्धा असणारा उदारमतवादी वर्ग आणि परंपरावादी, धार्मिक वर्ग ह्यांच्या संघर्षातून तिसरे फ्रेंच रिपब्लिक स्थापन झाले होते. पश्चिम आफ्रिकेत अनेक फ्रेंच वसाहती स्थापन झाल्या होत्या. दोनशे वर्षं बाह्य जगापासून हट्टाने संपर्क तोडून राहिलेल्या जपानी समाजाची दारं किलकिली झाली होती. दस्तुरखुद्द पॅरिस शहरही हाऊसमन ह्या नगररचनाशास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली आपले मध्ययुगीन अस्तित्व झटकून आधुनिक शहर बनण्याकडे वाटचाल करत होते.

ह्या उलथापालथीच्या काळातच पॅरिसमधल्या 'अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्स'चे रूढिप्रिय, पारंपरिक विषय आणि तंत्रांभोवतीच फिरणारे धोरण अनेक तरूण, वास्तववादी चित्रकारांनी झुगारून दिले. निव्वळ वळणदार, रेखीव रेषांपेक्षा आणि सूक्ष्म तपशीलांपेक्षा ब्रशच्या छोट्या, पण जोमदार फराट्यांनी चित्रात अधिक जिवंतपणा येऊ लागला. तोवर बव्हंशी स्टुडिओत बसून स्थिरचित्रे वा पोर्ट्रेट्स काढली जात. आता सूर्यप्रकाशात, मोकळ्या हवेत येऊन चित्रं रंगवण्याकडे कल वाढला. अंधार्‍या खोलीतून स्वच्छ सूर्यप्रकाशात आल्यावर जे बाहेरच्या जगातल्या रंगांचं आणि प्रकाशाचं आपल्यावर प्रथम 'इम्प्रेशन' पडतं, त्या क्षणिक आणि अस्थिर प्रभावाला चित्रात मूर्त रूप देण्याचा प्रयत्न इम्प्रेशनिस्ट चित्रकारांनी केला. एदुआर्द माने (Manet), देगा (Degas), मोने (Monet) ही ह्या क्षेत्रातली दिग्गज नावं. मोनेच्याच सूर्योदयाच्या ह्या चित्रावरून ह्या शैलीचे नामकरण इम्प्रेशनिझम असे झाले.

इम्प्रेशन, सनराईज - मोने

चित्रकलेच्या शैलीतले हे बदल इतक्या ढोबळपणे किंवा अगदी ठरवून झाले असं नव्हे. पण त्यामागे छायाचित्रणाचा शोध हा घटक नक्कीच महत्त्वाचा होता. याशिवाय औद्योगिक क्रांतीमुळे रंगांच्या दर्जात आणि वैविध्यात झालेले बदल; औद्योगिकीकरणाचेच अपत्य म्हणता येईल अशा नवीन खंडांशी होणार्‍या व्यापारामुळे व वसाहतवादामुळे मिळालेले नवीन वर्ण्यविषय हे इतर काही.

...

अर्थात हे नवीन तंत्रज्ञान चित्रकलेला पूरकही होतेच. अगदी बरोक कालखंडातल्या, छाया-प्रकाशाचा विलक्षण खेळ कॅनव्हासवर रेखाटणार्‍या कॅराव्हिजिओनेही 'कॅमेरा ऑब्स्क्युरा' ह्या प्राथमिक यंत्राचा उपयोग केल्याचे म्हटले जाते. पुढे १८७८ साली, एडवर्ड माइब्रिज ह्या ब्रिटिश छायाचित्रकाराने चौखूर धावणार्‍या घोड्याची छायाचित्रे घेतली.

या प्रयोगाने, तत्पूर्वी काढल्या गेलेल्या धावत्या घोड्यांच्या रेखाटनातल्या चुका ह्या प्रयोगाने दाखवून दिल्या. वानगीदाखल हे चित्र पहा -

...

इम्प्रेशनिझम असो वा फॉविझम - चित्रकलेतल्या शैलीतल्या बदलांचा उगम युरोपात आणि तोही प्रामुख्याने फ्रान्समध्ये झाला. छायाचित्रणाच्या कलेतल्या बदलांचे केंद्र मात्र काहीसे युरोपबाहेर, याच सुमारास जागतिक शक्ती म्हणून उदयाला येत असलेल्या अमेरिकेकडे सरकल्याचे दिसते.

छायाचित्रणाचा चित्रकलेत उपयोग करणार्‍यांमध्ये थॉमस एकिन्सचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. 'मेंडिंग द नेट'सारख्या त्याच्या चित्रांवर छायाचित्रांचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो .

एडवर्ड माइब्रिजच्या छायाचित्रण तंत्राच्या एक पाऊल पुढे जाऊन एकिन्सने अनेक प्रयोग केले. तत्कालीन वास्तववादी चित्रकारांनी कॅमेर्‍याच्या उपयोगाला नाकं मुरडली असली, तरी 'स्टडी इन ह्युमन मोशन' सारख्या प्रयोगांचा त्यांच्या तंत्राला फायदाच झाला. याच सुमारास पॉल स्ट्रँड, स्टिगलिझ, एडवर्ड स्टायकेन सारखे छायाचित्रकार आपल्या तंत्रात अनेक प्रयोग करत होते. पुढे अतिशय प्रसिद्ध झालेल्या f/64 ह्या छायाचित्रकारांच्या गटाचे हे पूर्वसूरी म्हणता येतील. स्ट्रँडचे 'स्टिल लाईफ विथ पेअर्स अँड बोल्स' हे एक उत्तम प्रातिनिधिक उदाहरण होऊ शकेल.

चित्रकार वाढत्या संख्येने छायाचित्रांचा उपयोग रेखाटनांसाठी कच्चा माल म्हणून करू लागले होते. नॉर्मन रॉकवेल ह्या सुप्रसिद्ध चित्रकाराची अनेक चित्रं ह्याच पद्धतीने कागदावर उतरली आहेत. (सरकचित्रांचा दुवा ) असं असलं तरी, छायाचित्र घेणे ही कला आहे की काय ह्यावर दुमत कायम होतंच. अगदी भाषेतला फरक लक्षात घेतला (photographs are 'taken', paintings are made) किंवा "The reason you can't look at a photograph for a long time is because there's virtually no time in it" ह्यासारखे तत्कालीन समीक्षकांचे मत असो. अनेक चित्रकारही आपण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे छायाचित्रांची मदत घेतो हे कटाक्षाने नाकारत.

पहिल्या महायुद्धानंतर प्रामुख्याने अमेरिकेत सुरू झालेली 'प्रिसिजनिझम' ही चित्रशैली ह्या अलगतेच्या भावनेला मिळालेला मोठा धक्का म्हणता येईल. पिकासोच्या अनेक शैलींपैकी एक अशी 'क्युबिझम' शैली, वेगाने होणारे औद्योगिकीकरण आणि छायाचित्रणाच्या तंत्रातील सुधारणा ह्या सार्‍यांचा परिणाम म्हणून 'प्रिसिजनिझम'कडे पाहता येईल. चार्ल्स शिरर, जॉर्जिया ओ'कीफ, फ्रान्सिस क्रिस, चार्ल्स डिमथ हे ह्या शैलीचा पुरस्कार करणारे आघाडीचे कलाकार.अमस्केग कॅनल, चार्ल्स शिरर

त्याही नंतर, म्हणजे १९६०च्या दशकात फोटोरिअ‍ॅलिझमची शैली प्रसिद्ध झाली. पॉप आर्टचा प्रभाव आणि अमूर्त वा मिनिमलिस्ट शैलीला प्रत्युत्तर म्हणून तिच्याकडे पाहता येईल.राल्फ्ज डायनर, राल्फ गोइंग्ज

अलीकडच्या काळाचा विचार केला तर चित्रकला आणि छायाचित्रण ह्यांच्यातला संघर्ष जवळजवळ संपल्यात जमा आहे. असं असलं, तरी अजूनही ह्या दोन्होंची सांगड घालणारे प्रयोग अजून होत आहेत. ह्या शतकात तर संगणक आणि विविध सॉफ्टवेअर्स ह्या मितीची ह्या समीकरणात भर पडली आहे. जॉर्जिया ओ'कीफच्या कर्मभूमीत, म्हणजे सँटा फे शहरात ह्या नव्या वाटेवरची छोटेखानी प्रदर्शनं पाहता येतात. मोठ्या प्रमाणावर म्हणायचं तर निओ-कन्सेप्च्युअल आणि अ‍ॅप्रोप्रिएशन (थोडक्यात सांगायचे तर जुने घटक एकत्र आणून नवनिर्मिती करणे) ह्या शैलींच्या मिश्रणातून अनेकदा रोचक कलाकृती पहायला मिळतात. उदाहरणादाखल, शेरी लविन ह्या कलाकाराने अलीकडेच 'After Seurat and After Stieglitz' ह्या परदशात सेझान, सुहा, अल्फ्रेड स्टिगलिझ ह्यांच्या कलाकृतींचे संगणकाद्वारे डिजिटलायझेशन करून मूळ चित्रांच्या व छायाचित्रांच्या अतिशय पिक्सिलेटेड आवृत्ती तयार केल्या होत्या. संगणक आणि आंतरजाल ह्यांचा आपल्या कलाजाणीवांवर कसा प्रभाव पडतो, ह्याचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न होता.

...

दृश्यकला, त्यांची बदलती तंत्रे आणि त्यांचा आपल्या अभिरूचीवर होणारा परिणाम हा खरं तर फार मोठा विषय. पण ह्या प्रदर्शनातून त्याच्या इतिहासात काही काळ डोकावून पाहण्याची संधी मिळाली. ह्या सार्‍या बदलांसह, निरनिराळ्या तंत्रांसोबतच अखेरीस लक्षात राहिलं ते जॉर्जिया ओ'कीफचं हे विधान - "Art must be a unity of expression so complete that the medium becomes unimportant, is only noticed or remembered as an afterthought."

...

संदर्भ -
१. Shared Intelligence: American Painting and the Photograph - बार्बरा लाईन्स, जोनाथन विनबर्ग
२. चित्रे आणि छायाचित्रांच्या प्रतिमा आंतरजालावरून साभार