ढीगभर लक्षणे, की एकसंध व्याधी? - १

धनंजय वैद्य

भाग १

लघुसारांश : शारीर लक्षणांच्या वाटेल त्या संचालाच आपण व्याधी म्हणत नाही. पण मग कुठल्या एकत्रित संचाला एकच व्याधी असल्याचे ठरवतो? याबद्दल स्पष्ट निकष वैद्यकात सर्वमान्य नाहीत. लक्षणांच्या मार्फत काय कारणनिदान आणि उपचार करायचे आहेत? त्याबाबत वेगवेगळ्या व्यावहारिक उपयुक्तता मनात आणून आपण लक्षणसंच जोखू शकतो. उपयुक्ततेप्रमाणे हे निकष वेगवेगळे आहेत. अशा वेगवेगळ्या निकषांबाबत या लेखात ऊहापोह केलेला आहे.

- - -
दीर्घसारांश : अधूनमधून कोणी संशोधक घोषणा करतात की अमुकतमुक लक्षणे असलेली एक नवीन व्याधी ओळखली जावी. (इंग्रजीत "नवा डिसीझ" म्हणण्यापूर्वी लक्षणांच्या समूहाला "नवा सिंड्रोम" असे प्राथमिक नामकरण करण्याची प्रथा आहे.) अशा नव्या घोषणेनंतर अन्य चिकित्सक साहाजिक शंका काढतात "हे काय उगाच नवीन फॅड?" विवादांत पुष्कळदा दोन्ही पक्षांनी न-जाणलेली त्रुटी तात्त्विक असते. पुढील मूलभूत प्रश्नांबाबत विवादकांची भूमिकाच स्पष्ट नसते. अस्पष्ट भूमिकेमुळे युक्तिवाद तपशिलात किती का गुंतले, तरी परस्परांसाठी निष्फळ ठरतात : (१) "स्वतंत्र ओळख असावी अशा व्याधी"ची व्याख्या काय? विश्लेषणाकरिता ज्ञानेंद्रिये-वा-चाचण्यांनी कळणारी लक्षणे हीच आपल्यापाशी असतात हे जाणून (२) लक्षणांची यादी ही स्वतंत्र नाव देण्यालायक व्याधी आहे किंवा नाही हे ठरवायचे विश्लेषणाचे निकष कुठले?

म्हणून वैद्यकशास्त्राच्या इतिहासातली काही नव-व्याधी ओळखण्याची यशस्वी उदाहरणे पडताळली पाहिजेत. ज्या व्याधींचे निदान करणे वैद्यकात निर्विवाद उपयोगी आहे, अशी उदाहरणे मनात आणून काही व्याख्या रेखाटता येतात, आणि व्याख्यांच्या अनुषंगाने विश्लेषणाकरिता काही निकषही ओळखता येतात.

(व्याख्या १) : स्वतंत्र व्याधीला कुठलेसे एक विवक्षित आणि ठाऊक असलेले मूळ कारण असते. पण ते कारण थेट ज्ञानेंद्रिय-किंवा-चाचण्यांनी जोखणे कठिण असते. सैद्धांतिक व्याख्या त्या मूळ कारणाने ठरत असली, तरी लक्षणांची यादी हीच व्याधीची व्यावहारिक व्याख्या होते. या व्याख्येनुसार निकष : एखाद्या पाहाणीत, कष्टसाध्य प्रयोगांनी का होईना, प्रत्येक रुग्णात व्याधीचे मूळ कारण तपासावे. यादीतील अधिकाधिक लक्षणे आढळल्यास रुग्णामध्ये व्याधीचे मूळ कारणही सापडण्याची संभवनीयता क्रमाक्रमाने "पुष्कळ"* वाढत जात असेल, तर तशा लक्षणांच्या यादी ही सुयोग्य व्याख्या मानावी.

(व्याख्या २) : एखाद्या स्वतंत्र व्याधीचे मूळ कारण असेलही, पण ते आपल्याला ठाऊक नसते. मात्र अनेक लक्षणे एका व्यक्तीमध्ये सापडणे इतके अनपेक्षित असते, की या सर्व लक्षणांकरिता एकच मूळ कारण असल्याबाबत अनुमान सयुक्तिक होते. या व्याख्येनुसार निकष : लोकांत यादीमधील प्रत्येक लक्षणाची स्वतःहून टक्केवारी बघता, त्यांच्यापैकी बहुसंख्य लक्षणे एकाच व्यक्तीत योगायोगाने सापडण्याच्या संभवनीयतेचे गणित करता येते. आणि बहुसंख्य लक्षणे एकत्र असलेल्या लोकांची टक्केवारी जर यापेक्षा "पुष्कळ"* अधिक असली, तर आपण म्हणू शकतो की "लक्षणांची ही यादी एकत्रित सापडते, पण ते अनपेक्षित आहे", आणि कदाचित पुढे कधी या यादीच्या मुळाशी एक कारण असल्याचे ढोबळ अनुमान करता येते.

(व्याख्या ३) यादीतील लक्षणांच्या एक-एक कलमाचे मूळ कारण आपल्याला वेगवेगळे म्हणून ठाऊक असते. पण त्या वेगवेगळ्या कारणांमुळे प्रत्येकी होणारे घातक दुष्परिणाम कारणे एकत्र उद्भवल्याने अपेक्षेपेक्षा अधिक (म्हणजे घातक परिणामांच्या साध्या बेरजेपेक्षा अधिक) असल्यास, त्या सर्व लक्षणांची एकत्र यादी करणे उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. या व्याख्येनुसार निकष : एकच लक्षण असल्यास निर्लक्षण व्यक्तीच्या मानाने सरासरी दुष्परिणाम (मृत्युदर, किंवा इंद्रियांचा कमकुवतपणा, वगैरे) किती होतो, ते रुग्णांचे निरीक्षण करून नोंदवावे. मग अनेक लक्षणे असली तर सरासरी दुष्परिणाम किती? याबाबत अपेक्षा बेरजेच्या गणिताने करता येते. मग ज्या रुग्णांत खरोखरीच यादीपैकी अनेक लक्षणे आहेत, त्यांच्यामधील सरासरी दुष्परिणाम नोंदवावे : ते अपेक्षेपेक्षा "पुष्कळ"* अधिक असतील तर ती यादी करण्यालायक आहे.

*पुष्कळ म्हणजे क्रियेस उद्युक्त करण्याइतपत प्रमाण.

वरील निकष परस्पर-सुसंगत असतीलच असे नाही. म्हणजे एका निकषाने लक्षणांची यादी "पुष्कळ" यशस्वी असली, तरी दुसर्‍या निकषाने सपशेल अयशस्वी असू शकते. विवादामध्ये एका विवादकाची अस्फुट व्याख्या एक असली, पण दुसर्‍या विवादकाची अस्फुट व्याख्या वेगळी असली, तर किती का अभ्यास करून निरीक्षणांची साधनसामग्री जमवली, तरी विवादातून सुसंवाद उद्भवू शकत नाही.

या लेखात एक क्रियाशील उदाहरण म्हणून वरील तीन निकष "मेटाबॉलिक सिंड्रोम" या विवादास्पद संकल्पनेला लावून दाखवलेले आहेत. मेटाबॉलिक सिन्ड्रोमच्या यादीमध्ये कमरेच्या घेरात मेदवृद्धी, सरासरीपेक्षा थोडा अधिक रक्तदाब, रक्तात सरासरीपेक्षा थोडी अधिक शर्करा, थोडे अधिक ट्रायग्लिसेराइड, आणि थोडे कमी प्रमाणात एचडीएल (चांगले) कोलेस्टेरॉल ही लक्षणे आहेत. "मल्टिएथ्निक स्टडी ऑफ आथेरोस्क्लेरोसिस्" या मोठ्या वैद्यकीय चाचणीमधील साधनसामग्री या निकषांवर तपासून बघता असे दिसले, की व्याख्या क्रमांक १ व २ च्या निकषांवर ही यादी उतरते, परंतु व्याख्या क्रमांक ३ च्या निकषांवर ही यादी उतरत नाही. प्रत्येक व्याख्या आणि त्या-त्या व्याख्येची प्रत्यक्ष उपयुक्तता जाणून या सिन्ड्रोमबाबत निर्णय करण्यात सुसंवाद साधू शकेल.

- - -

प्रस्तावना :

वैद्यकात नवीनवी निरीक्षणे आणि त्यांचे विश्लेषण अविरत चालू आहे. त्यात अधूनमधून एखाद्या नव्या व्याधीचे नामकरण केल्याच्या घोषणा आपण ऐकतो : १९८० काळातच "अक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिन्ड्रोम : एड्स्", मधुमेह वा हृद्रोगचिकित्सेच्या बाबतीत "मेटाबॉलिक सिन्ड्रोम" वगैरे नव्या व्याधींची नामकरणे झाली. नामकरण होते, तेव्हा रुग्णचिकित्सा करणार्‍या डॉक्टरांना त्या शब्दाशी अर्थातच कुठलीही ओळख नसते - त्यातून काही अर्थ निघावा, तर नामकरणाबरोबर सुरुवतीला त्या व्याधीच्या लक्षणांची यादी दिली जाते. नव्या व्याधीला "रोग=डिसीझ" म्हणण्याऐवजी "सिन्ड्रोम" (याकरिता मराठीमध्ये आपण "संलक्षण" असा शब्द वापरूया) म्हणण्याची पद्धत आहे, जेणेकरून हे नामकरण ठाम नसल्याचे थोडा नम्र भाव मुळात दिसत असावा. "संलक्षणा"मध्ये उघड लक्षणांनी झाकलेल्या अशा खर्‍या "रोगा"चे बर्‍यापैकी अनुमान होते, पण ते ठाम नसते, असाही व्यवहारोपयोगी भेद असतो. उदाहरणार्थ विकिपेडियाच्या सिंड्रोमबाबत उतार्‍यात (http://en.wikipedia.org/wiki/Syndrome) उदाहरण दिलेले आहे : मज्जापेशींवर विवक्षित दुष्परिणाम झालेल्या स्थितीसच "पार्किन्सन रोग" म्हणावे, मात्र ते ठाऊक नसल्यास बाह्य लक्षणांच्या संचास फक्त "पार्किन्सन संलक्षण" म्हणावे : हा लक्षणसंच कधीकधी मज्जापेशींच्या वेगळ्याच कुठल्या विकृतीनेसुद्धा होऊ शकतो. ही बाब मान्य करूनही "रोग" आणि "संलक्षण" यांतील भेद मी या लेखापुरता पाळणार नाही. "संलक्षणा"मध्ये "रोगा"बाबत ठाम निश्चिती नसली, तरी नवीन घोषित केलेल्या संलक्षणाने कुठल्याशा आंतरिक रोगाचेच निदान करायचे असते. म्हणजे नव्या संलक्षणाच्या शोधामध्ये गर्भितार्थाने नव्या रोगाचाच शोध सांगितलेला असतो.

असा कुठलाही लक्षणसंच एकत्र करून त्याला स्वतंत्र ओळख द्यायचे ठरवले, तर क्षेत्रात काम करणारे अन्य संशोधक साहजिकच शंका काढतात : हा नवीन प्रकार आपल्या शास्त्रात मानण्याची गरज तरी आहे काय? अशा बाबतीत मग भरपूर वादविवाद होतात. या वादविवादांत असे दिसते, की युक्तिवादाच्या नंतर आपलेच बरोबर आहे असे प्रतिवावादींपैकी प्रत्येकाचा निष्कर्ष असतो. युक्तिवाद जर गणितीय किंवा तर्कशास्त्रीय असला, तर खरे म्हणजे असे व्हायला नको. अशा असफल युक्तिवादांमुळे आपल्याला निर्देश मिळतो, की प्रतिवादींची तर्कशास्त्रीय चौकट वेगवेगळी असली पाहिजे. तेच आकडे सुरुवातीला घेतले, पण वेगवेगळ्याच गणितात मांडले, तर उत्तराचा ताळा जमणार नाही, यात आश्चर्य ते काय? मात्र तर्कशास्त्रीय चौकट आधी सुस्पष्ट सांगण्याची पद्धत नाही. इतकेच काय स्वतःची तर्कशास्त्रीय चौकट स्वतःसाठी स्पष्ट करून बघायची शिस्त देखील क्वचितच दिसते. युक्तिवाद मांडण्यापूर्वीच पुढील मूलभूत मुद्द्यांबाबत विवादकांनी समन्वय साधावा, तर विवादाच्या शेवटी संवाद साधून प्रगती होण्याची शक्यता तरी आहे : (१) "स्वतंत्र ओळख असावी अशा व्याधी"ची व्याख्या काय? विश्लेषणाकरिता ज्ञानेंद्रिये-वा-चाचण्यांनी कळणारी लक्षणे हीच आपल्यापाशी असतात हे जाणून (२) लक्षणांची यादी ही स्वतंत्र नाव देण्यालायक व्याधी आहे किंवा नाही हे ठरवायचे विश्लेषणाचे निकष कुठले?

या लेखात या प्रश्नांची अभूतपूर्व उत्तरे देण्याचा मनसुबा नाही. या प्रश्नांची संदिग्धता असली तरी वैद्यक हे कित्येक बाबींत यशस्वी आहे. १९८० दशकातच सांगितलेल्या दोन संलक्षणांच्या उदाहरणांपैकी एड्स् बाबत विवाद लवकर शमले - थोड्याच वेळात सर्व गंभीर संशोधकांनी त्या संलक्षणाची उपयुक्तता आणि एकजिनसिता मान्य केली होती. मेटाबॉलिक सिन्ड्रोमबाबत वाद मात्र तीन दशके चालूच आहे. दोहोंच्या बाबतीत विपुल निरीक्षणांची आणि अभ्यासप्रकल्पांची साधनसामग्री आहे. यांच्या विश्लेषणात काय बरे फरक होता, जेणेकरून एकाच्या बाबतीत एकवाक्यता लवकर झाली, दुसर्‍याच्या बाबतीत झाली नाही? तत्त्वचर्चा आवश्यक नाही, कालांतराने सगळे गुंते सुटतीलही. पण तत्त्वे कळल्यास विवादांची संवादात प्रगती करण्याच्या बाबत आपण अधिक कार्यक्षम विश्लेषण करू शकू.

आपण दीर्घ अनुभवानंतर उपयुक्तता सिद्ध झालेल्या यशस्वी संलक्षणांचे नमुने बघून काही अनुमान करणार आहोत : या प्रश्नांची आजवर अस्फुट असलेली स्पष्टीकरणे काय-काय असावी?