ढीगभर लक्षणे, की एकसंध व्याधी? - ४

धनंजय वैद्य

भाग ४

व्याख्या २ (अज्ञात अशा कारणाने लक्षणांचे अनपेक्षित प्रमाणात एकत्र येणे) प्रमाणे विश्लेषण :

या संलक्षणाच्या मुळाशी "पेशींचे इन्सुलिनला दाद न देणे" हे मूळ कारण असण्याबाबत विवाद आहे. ते मूळ कारण नसून आणखी एक आनुषंगिक लक्षणच आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. तरी सुद्धा हे संलक्षण मानण्यालायक आहे काय? यातील लक्षणे एकत्र येण्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा खूप अधिक आहे काय? हे आपल्या दुसर्‍या व्याख्येसारखे झाले. आता "अपेक्षेपेक्षा अधिक" म्हणजे काय? यासाठी सोपे गणित म्हणून दोन लक्षणांचा संच घेऊया. जर पहिले लक्षण क्ष% (उदाहरणार्थ २०%) लोकांत सापडते, आणि दुसरे लक्षण य% (उदाहरणार्थ ३०%) लोकांत सापडते, तर आपली अपेक्षा असते, की कुठलेच लक्षण नसलेले (१०० - क्ष)*(१०० - य)/१०० (सोप्या उदाहरणात २०*३०/१०० = ५६%) इतके टक्के लोक असतील; आणि दोन्ही लक्षणे असलेले क्ष*य/१०० (सोप्या उदाहरणात २०*३०/१०० = ६%) इतके टक्के लोक असतील. उर्वरित (सोप्या उदाहरणात १००-५६-६=३८%) लोकांबाबत आपली अपेक्षा असेल की फक्त पहिलेच लक्षण किंवा फक्त दुसरेच लक्षण असेल. मात्र निरीक्षण करता आपल्याला दिसून येऊ शकते, की दोन्ही लक्षणे आणि दोहोंपैकी कुठलेच लक्षण नाही, असे लोक या अपेक्षित टक्केवारीपेक्षा अधिक असू शकतील. आणि दोहोंपैकी फक्त एकच लक्षण असलेले लोक अपेक्षेपेक्षा कमी असू शकतील. मग आपण म्हणू की ही दोन लक्षणे जेव्हा एकत्र असतात (किंवा दोन्हीचा अभाव असतो), तेव्हा कित्येकदा ते यदृच्छेने होण्यापेक्षा "अनपेक्षित" आहे. जसे हे सोपे गणित आपण २ लक्षणांबाबत केले, तसेच हे गणित ५ लक्षणांच्या बाबतीतही केले जाऊ शकते. (पाच लक्षणांच्या गणिताच्या पायर्‍या बघण्यासाठी संदर्भ ९ पडताळावा . )

खालील आकृतीमध्ये ०-५ या लक्षणांची संख्या स्त्रिया आणि पुरुषांमध्ये किती-किती टक्के अपेक्षित आहेत, आणि प्रत्यक्षात ही लक्षणे किती-किती टक्क्यांमध्ये दिसली त्याचा आलेख आहे. आपणांस दिसते की ४-५ लक्षणे अपेक्षेपेक्षा अधिक टक्क्यांत एकत्र दिसतात, आणि कुठलेच लक्षण नाही (० लक्षणे) अशी टक्केवारी देखील अपेक्षेपेक्षा अधिक आहे. अर्थातच टक्केवारीच्या १००% हिशोबाचा ताळा साधावा, म्हणजे ठीक २ किंवा ठीक ३ लक्षणे असलेली टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसते. (अपेक्षेपेक्षा वेगळेपणा हा यदृच्छेने असण्याची संभवनीयता > ५% आहे.)

या विश्लेषणावरून आपण निष्कर्ष काढू शकतो, की लक्षणे एकत्रित दिसणे काही प्रमाणात अनपेक्षित आहे. म्हणूनच या संलक्षणाचे कुठलेसे मूळ कारण असण्याबाबत आपली धारणा होणे रास्त आहे - भले ते मूळ कारण "इन्सुलिनची अकार्यक्षमता" यापेक्षा वेगळे का असेना.

व्याख्या ३ (लक्षणांचे एकत्रित घातक परिणाम बेरजेच्या अपेक्षेपेक्षा अधिक) प्रमाणे विश्लेषण :

काही तज्ज्ञांचा विचार असतो, की या संलक्षणातील प्रत्येक लक्षण (म्हणजे लठ्ठपणा, अधिक रक्तदाब, वगैरे प्रत्येक) हानिकारक आहे, हे तर आपल्याला आधीच ठाऊक आहे. यातील प्रत्येक लक्षण काही प्रमाणात इंद्रियांना दुखापत करते. यातील सर्वात अधिक घातक इजा म्हणजे रक्तवाहिन्यांना होते. या तज्ज्ञांच्या मते प्रत्येक लक्षणाचा एवीतेवी उपचार करायचाच असतो. संलक्षण एकत्र मानण्याचा काय फायदा? ही लक्षणे एकत्र आल्यामुळे इजा नुसती बेरजेइतकीच अधिक होते, की अवाच्यासवा अधिक होते? प्रत्येक लक्षणाच्या हानीच्या बेरजेपेक्षा एकत्रित संलक्षण अधिक हानिकारक असेल, तर संलक्षण मानण्यात काही हशील आहे. प्रत्येक रुग्णात नव्हे, तरी मेसा सारख्या अभ्यासप्रकल्पात रक्तवाहिन्यांना झालेल्या इजेची सूक्ष्म चाचणी करता येते. एका प्रकारची इजा म्हणजे धमनीच्या आत "इन्टिमा-मीडिया" हे तलम अस्तर असते, ते जाड (जाड म्हणून राठ) होऊ लागते. याचे मोजमाप म्हणजे "इन्टिमा-मीडिया-जाडी". मेसा अभ्यासप्रकल्पात इंटर्नल कॅरॉटिड धमनीचे अल्ट्रासाउंड चित्रण करून हे मोजमाप केले गेले. कुठलेच लक्षण नसलेल्या व्यक्तींची सरासरी इन्टिमा-मीडिया-जाडी किती? फक्त एक-एकच लक्षण असलेल्यांची सरासरी इन्टिमा-मीडिया-जाडी किती? एकदा का हे माहीत असले, तर २, ३, ४, ५ लक्षणे एकत्र असली तर जाडी काय असेल, याबाबत आपण बेरजेची अपेक्षा करू शकतो. मग खरोखर २, ३, ४, ५ लक्षणे असलेल्या व्यक्तींचे निरीक्षण करून आपण जोखू शकतो - अपेक्षेपेक्षा त्यांची सरासरी इन्टिमा-मीडिया-जाडी कमी आहे, समसमान आहे, की अधिक आहे?

खालील आकृतीमध्ये स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये केलेली ही सरासरी मोजमापे चित्रित केलेली आहेत.

प्रत्येक लक्षण फक्त एक-एक करून (बाकी कुठलेच लक्षण नसलेल्या) लोकांची इन्टिमा-मीडिया जाडी पूर्ण निर्लक्षण असलेल्या लोकांच्या सरासरी जाडीपेक्षा किती अधिक आहे? ते आकडे एकावर एक मांडून पाचही लक्षणांची अपेक्षित बेरीज आपल्याला दिसते. त्या बेरजेच्या तुलनेने बघूया. संलक्षण असलेल्या लोकांची सरासरी इन्टिमा जाडी ही निर्लक्षण लोकांच्या जाडीपेक्षा तितकीही जाड नाही. मग संलक्षण म्हणजे ३ किंवा अधिक लक्षणे घ्या, की ५च्या ५ लक्षणे असलेले लोक घ्या. मात्र हे बेरजेहून कमी असणे मात्र यद्दृच्छेने होण्याइतपतच आहे (संभवनीयता >१०-२५%).

या विश्लेषणावरून आपल्याला दिसते, की धमनीच्या या इजेपुरते बघता तरी हे संलक्षण या निकषाला उतरत नाही. अर्थातच या निकषा ऐवजी हृदयविकाराचे झटके, अकालमृत्यू वगैरेचे भविष्यातील दर हीच इजा मानून हेच विश्लेषण भविष्यात मेसा अभ्यासप्रकल्पात करता येईल. परंतु सकृद्दर्शनी तरी हे संलक्षण या व्याख्येने निरुपयोगी सिद्ध होते.

गोषवारा :

संलक्षणाच्या यादीची व्याधी मानून न मानून वैद्य-डॉक्टर-सामान्य मनुष्य काय व्यावहारिक क्रिया करणार आहे? याबाबत दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात. प्रत्येक दृष्टिकोनातून "संलक्षण म्हणजे काय" याबाबत वेगवेगळ्या व्याख्या आणि अनुक्रमे वेगवेगळे निकष ठरतात. मात्र फक्त व्याख्या वेगळ्या म्हनजे विश्लेषणही करता येत नाही, कसली सिद्धताही करता येत नाही, असे मात्र नसते. व्यावहारिक उपयुक्तता डोळ्यासमोर ठेवून व्याख्या असंदिग्ध करता येतात, आणि असंदिग्ध व्याख्या झाली तर त्यानुसार गणिताने सिद्ध करता येतील असे निकष स्पष्ट होतात. अशा तीन व्याख्या आपण बघितल्या आहेत. त्या व्याख्यांपासून उद्भवलेल्या निकषांवर आपण विवादास्पद "मेटाबॉलिक सिन्ड्रोम" तपासून बघितला. आपल्याला असे दिसले, की पहिल्या दोन व्याख्यांप्रमाणे हे संलक्षण एकजिनसी म्हणून मानण्यालायक आहे, तर तिसर्‍या व्याखेनुसार हे संलक्षण एकजिनसी न मानावे असा निर्णय मिळतो. हे तीन निर्णय भिन्न असले, तरी आपल्या विश्लेषणात कुठलाच अंतर्विरोध नाही. कारण प्रत्येक व्याख्येचे व्यवहारक्षेत्र वेगवेगळे आहे. संलक्षण तिसर्‍या व्याख्येत नापास झाल्यामुळे हे कळते, की लक्षणांचे बाहुल्य असल्यामुळे अवाच्या सवा दुष्परिणाम होतील, अशी भीती बाळगता कामा नये, आणि ही भीती नसल्यामुळे उपचारांमध्ये तारतम्य येईल. मात्र जे रोगचिकित्सक (१) "इन्सुलिनची अकार्यक्षमता" हे कारण जोखू इच्छितात, अथवा (२) "इन्सुलिनची अकार्यक्षमता" यावेगळे कुठले अज्ञात मूळ कारण शोधण्याकरिता हे संलक्षण वापरून रुग्णांचे विशेष निरीक्षण करत आहेत, त्या दोहोंसाठी हे संलक्षण मानण्याने फायदा होऊ शकतो.

वर सांगितलेल्या व्याख्या आणि तपशीलवार गणिती विश्लेषण जरी मेटाबॉलिक सिन्ड्रोम या विवक्षित संलक्षणाचे असले, तरी या उदाहरणाने कुठलेही संलक्षण तपासता येईल.

- - -

संदर्भसूची :

१. गौतमन्यायसूत्रे. Original with English translation by Mrinalkanti Gangopadhyaya.1982; Publisher: Indian Studies, Kolkata.

२. माधवनिदान. महादेव गोपाळ शास्त्री अमरापुरकर यांचे संस्करण व मराठी भाषांतर. (प्रकाशक आणि प्रकाशनवर्ष वापरलेल्या प्रतीत उपलब्ध नाहीत.)

३. Jones TD (1944). "The diagnosis of rheumatic fever.". JAMA 126: 481–4.

४. Down JLB (1866) "Observations on an ethnic classification of idiots". Clinical Lecture Reports, London Hospital 3: 259–262.)

५Fauci AS. The syndrome of Kaposi's sarcoma and opportunistic infections: an epidemiologically restricted disorder of immunoregulation. Ann Intern Med. 1982 Jun;96(6 Pt 1):777-9.

६ Pelletier DL et al. Epidemiologic evidence for a potentiating effect of malnutrition on child mortality. Am J Public Health 1993;83:1130-1133

७ Srivastava AK et al. A clinical and aetiological study of diarrhoea in hospitalized children at Lucknow. Indian Journal of Medical Research 1973;61:596-602.

८ Rice AL et al. Malnutrition as an Underlying Cause of Childhood Deaths Associated with Infectious Diseases in Developing Countries. Bulletin of the World Health Organization 2000;78:1207-1221

९ Vaidya et al. Defining the metabolic syndrome construct: Multi-Ethnic Study of Atherosclerosis (MESA) cross-sectional analysis. Diabetes Care. 2007 Aug;30(8):2086-90.

१० Kahn R, et al. The metabolic syndrome: time for a critical appraisal: joint statement from the American Diabetes Association and the European Association for the Study of Diabetes. Diabetes Care 28: 2289–304, 2005

११ Zimmet PZ and Alberti G. The metabolic syndrome: perhaps an etiologic mystery but far from a myth: where does the International Diabetes Federation stand? [subscription article online]. Medscape Diabetes and Endocrinology, 2005. Available from http://www.medscape.com/viewarticle/514211. Accessed 13 June 2007

१२ Kahn R et al. Author response to “The metabolic syndrome: perhaps an etiologic mystery but far from a myth: where does the International Diabetes Federation stand?” [subscription article online]. Medscape Diabetes and Endocrinology, 2005. Available from http://www.medscape.com/viewarticle/515102. Accessed 13 June 2007

१३ Grundy SM et al. Definition of metabolic syndrome: report of the National, Heart, Lung, and Blood Institute/American Heart Association conference on scientific issues related to definition. Circulation. 2004;109:433-438

समाप्त.

धनंजय वैद्य बॉल्टिमोर, मेरिलँड येथे राहातो. हृदयरोगाविषयी सांख्यिकी विश्लेषण करतो.