भाग २
प्राचीन भारतीय तात्त्विक विचार आणि आयुर्वेदातील संकल्पना
लेखाच्या उर्वरित भागात विचार गेल्या दोन शतकांतील आधुनिक वैद्यकशास्त्रास अनुसरून विश्लेषण केलेले आहे. तत्त्वतः ते कुठल्याही व्याधीचिकित्साश्स्त्राला लागू आहे. म्हणून येथे प्राचीन भारतीय वैचारिक चौकट संक्षेपाने रेखाटतो.
खरे पाहाता प्रश्न वैद्यकशास्त्रापेक्षा फार व्यापक आहे : अमुक अवयव-असलेली वस्तू आहे, असे कोणी म्हटल्यास अनेक अवयवांचा ढीग मानण्याऐवजी ही एकच वस्तू आहे, असे मानावे तरी कशाकरिता? या बाबतीत न्यायसूत्रात गौतम काही निर्देश देतो : संदर्भ १
धारण-आकर्षण-उपपत्तेश्च (अवयवी) । (न्या. सू. २.१.३५)
म्हणजे ही जी अवयव-असलेली वस्तू आहे असे आपण म्हणतो, ती सर्व अवयवांसकरट उचलून धरता येते (धारण), ती ओढून घेता सर्व अवयवांसकट ओढली जाते (आकर्षण), म्हणून ते अवयव असलेली एकच अवयवी वस्तू आहे, असे म्हणता येते. हे निकष फक्त एक-घडा, एक-कपडा, एक-मनुष्यव्यक्ती, वगैरे अवकाशाचा मर्यादित भाग व्यापणार्या पिंडालाच थेट लावता येतात, हे खरे आहे. परंतु अवकाशात एकाच मर्यादित ठिकाणी नाही अशी गोष्ट असली, तरी हा विचार लागू करता येतो. एकच संकल्पना असण्यासाठी त्यातील लक्षण-अवयव एकत्र दिसावेत (धारण), मुद्दामून एकच लक्षण-अवयव मनात आणल्यास अनायासे बाकी सर्व लक्षण अवयवही त्याबरोबरच राहिल्याचे दिसून यावेत (आकर्षण). परंतु जड पिंडासाठी धरणे आणि ओढणे या क्रिया आपल्या हाताने सहज करता येतात, त्या प्रकारे अनेक-अवयव असलेल्या संकल्पनांबाबत नाही.
खरे तर अशा गोष्टी म्हणजे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात सांगितलेल्या "जाति" संकल्पनेशी संलग्न आहेत. याबाबतसुद्धा आपण गौतमाच्या व्याख्या बघूया.
समानप्रसवात्मिका जाति: । न्या. सू. २.२.६६
आकृतिर्जातिलिङ्गाख्या । न्या. सू. २.२.६५
न्या. सू. २.२.६६ सूत्राचे स्पष्टीकरण : (तिरका ठसा) जी अनेक ठिकाणी समान बुद्धीस जन्म देते, जिच्यामुळे खूप वस्तू असता एकामेकांत फरक नसल्याचे जाणवते, (ती जाती.) अनेक ठिकाणी जो अर्थ समान अनुभव घडवतो, त्यास "सामान्य" म्हणतात. काही वस्तूंमध्ये (एकामेकांत) भेद नाही, पण काही वस्तूंमध्ये भेद आहे, (असा बोध करून देण्याचे) असे वैशिष्ट्य असलेले 'सामान्य" म्हणजे जाती होय.
आपल्या विषयाच्या संदर्भात बघूया. जी कुठली नवीन व्याधी कोणी संशोधक घोषित करत आहे, ती वेगवेगळ्या रुग्णांमध्ये असली, तरी तिने निरीक्षण-चिकित्सा करणार्यामध्ये समान बुद्धीस जन्म दिला पाहिजे, असा त्या घोषणेचा अभिप्राय असतो. आता ती नवीन असल्यामुळे घोषणेच्या काळात असा कुठला बोध वैद्यकक्षेत्रात होत नाहीच. म्हणून आपल्याला न्या. सू. २.२.६५ चा उपयोग होतो :
(तिरका ठसा) जिने जाती आणि जातीची चिन्हे-लक्षणे प्रसिद्ध असतात, तिला आकृती जाणावे. असलेल्या अवयवांची आणि त्यांच्या भागांची ठराविक बांधणी म्हणजे आकृती - त्यावेगळे काही नाही.
आपल्या वैद्यकीय संदर्भात लक्षणांची ठराविक बांधणी, म्हणजेच संलक्षण, ही बांधणीच जाती असलेल्या नवीन व्याधीची आकृती होय. ही बांधणी म्हणजे लक्षणांचा ढीग आहे, की यांची मिळून एक अवयविनी संकल्पना होते, याबाबत विवाद आहे.
या व्यापक तत्त्वचर्चेने पुढील विश्लेषणास एक परंपरा मिळते. परंतु विश्लेषण नेमके काय असावे, याबाबत थेट पर्याय मिळत नाहीत.
या वैश्विक व्यापक तत्त्वचर्चेनंतर वैद्यक-व्यापी अशी एक गोष्ट बघूया. आयुर्वेदातील स्वास्थ्य-व्याधिवर्णनाचे घटक - म्हणजे त्रिदोष, आणि त्यांचे उपचार हे नव्या वैद्यकशस्त्रातील जीवरसायने-जंतू यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. तरी व्याधी अथवा रोग म्हणजे काय, या मूलभूत प्रश्नाबाबत काही साम्य आहे. माधवनिदानात म्हटले आहे :संदर्भ २
निदानं पूर्वरूपाणि रूपाण्युपशयस्तथा ।
संप्राप्तिश्चेति विज्ञानं रोगाणां पञ्चधा स्मृतम् ॥ मा. नि. ४
रोगाचे विज्ञान पाच विधांनी होते (१) निदान, म्हणजे कुठला दोष दुष्ट झाला आहे, ते मूळ कारण, (२) संप्राप्ती, म्हणजे तो दोष दुष्ट झाला तो वर-खाली-वाकडा वगैरे तपशील, (३) पूर्वरूप, म्हणजे उगम पावणार्या अस्फुट व्याधीची लक्षणे, (४) रूप, म्हणजे व्यक्त झालेल्या व्याधीची सुस्पष्ट लक्षणे, आणि (५) उपशय, म्हणजे मूळ कारण वा लक्षणांना अनुलक्षून उपचार करता त्यांचा अपेक्षित परिणाम.
यातही (१) व (२) हे पुष्कळदा वैद्याला माहीत नसतात - किंवा कित्येकदा सर्वच दोष एकत्र दुष्ट झालेले असतात. (३) व (४) ही लक्षणांची यादी, म्हणजेच रोगाचे विज्ञान होण्याकरता संलक्षणच. मुद्दा (५) चे महत्त्व सुद्धा फार आहे : रोगविज्ञान हे उपचारांच्या परिणामांची कल्पना करून देते, नाहीतर त्यात व्यवहार्य असे काही नाही.
उर्वरित लेखातील विश्लेषणात आधुनिक वैद्यकातीलच उदाहरणे दिलेली आहेत, तरी (१) "व्याधी उत्पन्न करणारे कारण एक असल्यामुळे लक्षणे एकत्र येणे", (२) "लक्षणांच्या यादीने अज्ञात मूळ कारणाचा शोध लागण्यास मदत" आणि (३) "लक्षणांच्या यादीने उपचाराचा परिणाम जोखण्यास मदत", ही व्यापक प्रयोजने आयुर्वेदासह सर्वच वैद्यकीय चिकित्सकांना सामायिक आहेत, याची कल्पना यावी.
- - -
आधुनिक वैद्यकातली काही यशस्वी संलक्षणांची उदाहरणे
र्ह्युमॅटिक ज्वराकरिता डकेट-जोन्स लक्षणसंच :
या लक्षणासंचाला "सिन्ड्रोम" म्हणायची पद्धत नसली, तरी हा लक्षणसंच र्ह्युमॅटिक ज्वराच्या निदानासाठी सर्रास वापरला जातो, आणि उपचार करण्यापूर्वी आणखी खात्रीची गरज मानली जात नाही. वस्तुतः या व्याधीचे मूळ कारण ज्ञात आहे : स्ट्रेप्टोकॉकसची घशात लागण होते आणि लागण समाप्त झाल्यानंतरसुद्धा शरिराची प्रतिकारशक्ती शरिरातील पेशींवरच हल्ला चालू ठेवते, त्यामुळे ही व्याधी होते. मात्र याची थेट चाचणी करता येत नाही. कारण रुग्ण जेव्हा डॉक्टरापाशी आलेला असतो, तोवर घशातील स्ट्रेप्टोकॉकस जीवाणू कधीच नाहिसे झालेले असतात. म्हणून निदानाकरिता (१) अनेक सांध्यांत सूज, (२) हृदयाच्या ठोक्यांत घरघर (murmur), (३) कातडीत न-दुखणार्या गुठळ्या... वगैरे, प्रधान आणि गौण अशी लक्षणे यादीत आहेत. यादीतील जितकी लक्षणे रुग्णात असतील तितके निदान खात्रीलायक होते, आणि लगेच उपचार सुरू करण्यात येतो. या यादीच्या उपयुक्ततेतून, म्हणजेच "यशा"तून आपल्याला दिसते, की मूळ कारणाची थेट चाचणी करता येत नसेल, तर मूळ कारणाशी संलग्न अशा लक्षणांची यादी करता येते. अट अशी, की अधिकाधिक लक्षणे असली तर मूळ कारणाबद्दल खात्री अधिकाधिक झाली पाहिजे. हे लक्षात असू द्यावे, की यादीतली अधिक लक्षणे असली म्हणून र्ह्युमॅटिक ज्वराची व्याधी काही अधिक जालिम नसते. त्यामुळे कारणनिदानाबाबत उपयुक्तता असली, तर रोगाच्या विकोपाला जाण्याबाबत भाकीत करण्याची उपयुक्तता यादीत नसली, तरी चालते.संदर्भ ३
डाऊन्स सिन्ड्रोम
१८६६ मध्ये जे.एल.एच.डाऊन यांनी लंडनमधील आपली निरीक्षणे प्रसिद्ध केली.संदर्भ ४ डाऊन लंडनमध्ये मतिमंत बालकांचा उपचार करे. त्याला असे दिसले, की चिरेसारखे डोळे, कानांची विशिष्ट ठेवण, वगैरे "मंगोलॉइड" लक्षणे असलेली बालके मतिमंद बालकांपैकी १०% इतकी होती. खरे तर बारीक डोळे, कानांची ठेवण, वगैरे, वगैरे प्रत्येक लक्षण मतिमंद नसलेल्या इंग्रज लोकांतही आढळतेच. पण ही सर्व लक्षणे एकाच व्यक्तीत सापडण्याची संभवनीयता खूप कमी असते. त्या मानाने हे १०% म्हणजे फारच होते. (१०% म्हणजे मतिमंदांपैकी बहुसंख्यता नव्हे, फक्त अपेक्षित टक्केवारीपेक्षा अधिक, ही नोंद मनात ठेवली पाहिजे.) त्यामुळे हा लक्षणसंच मननीय होता. डाऊनला, किंवा त्याच्यानंतर कित्येक दशके कोणालाचयाचे मूळ कारण माहीत नव्हते. त्यामुळे उपचाराने कारणाचा प्रतिकार करायचा प्रश्नच नव्हता. तरी ही व्याधी समजणे उपयोगाचे होते. कारण ही लक्षणे असलेली मतिमंद बालके काही विवक्षित प्रकारच्या प्रशिक्षणाने अधिक शिकत. (आज आपल्याला मूळ कारण माहीत आहे - रंग/गुणसूत्रातला दोष आहे - पण ही बाब अलाहिदा.) डाऊनच्या काळात आणि त्यानंतर कित्येक दशके हा लक्षणसंच उपयुक्त ठरण्यासाठी आपल्याला असा हा निर्देश मिळतो : एक-एक करून लक्षणे लोकांत दिसत असली, तरी ती एकत्र दिसण्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा अधिक असले, तर त्याच्या मुळाशी अजून अज्ञात असे कुठले कारण आहे, असा ठोकताळा बांधता येतो. अर्थात त्यापासून उपचाराबाबत काही निर्देश मिळत असेल, तरच अशा संचाची उपयुक्तता आहे. (आणखी एक उदाहरण आहे ऍक्वायर्ड इम्म्यून डेफिशियन्सी सिन्ड्रोम, एड्स्. मूळ कारण असलेल्या एचआयव्ही विषाणूबाबत ज्ञान मिळण्यापूर्वीच या लक्षणसंचाला ओळखले गेले होते.संदर्भ ५)
अतिसार-कुपोषण दुष्टयुती
भारतात अतिशय कुपोषित बालकांचा (म्हणजे वयासाठी अपेक्षित मध्यवर्ती - मीडियन - वजनाच्या मानाने <६०% वजन असणार्या बलकांचा) वार्षिक मृत्यूदर ४% आहे, असे एका पाहणीत दिसून आले.संदर्भ ६ अतिसार (डायरिया) झालेल्या सुपोषित बालकांचा मृत्यूदर हा ३.८% इतका आणखी एका पाहणीत दिसून आले.संदर्भ ७ म्हणजे कुपोषित बालकांचा मृत्यूदर नुसता बेरजे-गुणाकारानेच अधिक असेल, पण तेवढ्याने आपली अपेक्षा असेल की अशा बलकांत दर ८%सुद्धा असू शकेल. परंतु त्या पाहाणीत दिसून आले, की प्रत्यक्षात अतिशय कुपोषित बालकांचा मृत्यूदर २३% होता. या प्रकारे अनेक देशांतली आकडे वारी बघता असेच दिसून आलेले आहे, की बालके कुपोषण आणि अतिसार/हागवण या दोहोंनी पीडित असली, तर प्रत्येक दुखण्याच्या मृत्युदराच्या अपेक्षित बेरजेपेक्षा या बलकांचा मृत्यूदर फारच अधिक असतो.संदर्भ ८ म्हणूनच दोन्ही व्याधींची लक्षणे एका यादीत मांडणे त्यांच्याकडे एकत्रित लक्ष देणे उपचारासाठी महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत त्या लक्षणांची मूळ कारणे वेगवेगळी आहेत - अतिसाराचे मूळ कारण रोगजंतूंची लागण, आणि कुपोषणाचे मूळ कारण अन्नाची अनुपलब्धता - असे असले तरी ते अनेककारणत्व महत्त्वाचे नसते.