कर्नल मकेंझीचा ऐतिहासिक खजिना: एका दक्षिणी दस्तऐवजातले बहुभाषिक स्वर - १

रोचना

स्कॉटलंडच्या औटर हेब्रिडीज द्वीपांचा रहिवासी कॉलिन मकेंझी १७८३ साली वयाच्या २९व्या वर्षी इंडिया कंपनीच्या लष्करात नोकरी पत्करून भारतात आला. मकेंझीच्या नेतृत्वाखाली सर्वेक्षण खाते कंपनी सरकाराच्या विस्ताराचे आणि स्थिरावण्याचे प्रबळ साधन बनले. नकाशाशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र, आणि बारीक भौगोलिक-लष्करी ज्ञान यांचे विलक्षण मिश्रण असलेल्या आधुनिक सर्वेक्षणशास्त्राचे उद्घाटन मकेंझीने कंपनी सरकारात केले.

 
भाग १

स्कॉटलंडच्या औटर हेब्रिडीज द्वीपांचा रहिवासी कॉलिन मकेंझी १७८३ साली वयाच्या २९व्या वर्षी इंडिया कंपनीच्या लष्करात नोकरी पत्करून भारतात आला. त्याला अभियांत्रिकी ज्ञानासहित गणितातही रस होता, आणि तो कंपनीच्या लष्करी इंजिनियर्स विभागात रुजू झाला. म्हैसूरच्या टिपू सुल्तानशी १७९९ साली झालेल्या अंतिम लढाईत तो कंपनीच्या मद्रास सैन्यात होता. तोफांच्या रणव्युहात मकेंझीचे अभियांत्रिकी आणि त्रिकोणमितिक कौशल्य महत्त्वाचे ठरले. टिपूकडून जिंकलेल्या प्रदेशाच्या जमाबंदीचे, प्रांतांच्या सीमारेषांच्या निर्णयाचे कामही मकेंझीने केले. १८१० साली तो मद्रास इलाख्याचा, आणि १८१५ साली ब्रिटिश इंडियाचा पहिला सर्वेक्षण-प्रमुख झाला. १८२१ साली याच पदावर असताना तो कलकत्त्यात मरण पावला. मकेंझीच्या नेतृत्वाखाली सर्वेक्षण खाते कंपनी सरकाराच्या विस्ताराचे आणि स्थिरावण्याचे प्रबळ साधन बनले. या आधी प्रांत-इलाक्यांच्या आकारणीसाठी प्रवाशांच्या वर्णनांवर व स्थानिक लोकांच्या स्फुट माहितीवर कंपनी अवलंबून राहात असे. नकाशाशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र, आणि बारीक भौगोलिक-लष्करी ज्ञान यांचे विलक्षण मिश्रण असलेल्या आधुनिक सर्वेक्षणशास्त्राचे उद्घाटन मकेंझीने कंपनी सरकारात केले.


कर्नल कॉलिन मकेंझी यांचे टॉमस हिकी यांनी १८१६ साली केलेले
चित्र. त्याच्या सोबत देशी सहाय्यक बहुदा तिघे कवली वेंकट बंधू आहेत
- बोरैया, लक्ष्मैया आणि रामस्वामी."

मकेंझीने भारतातली पहिली दहा-बारा वर्षे, कंपनीच्या अनेक साहसी लढवय्यांसारखीच, "एका अनंत युद्धात" काढली. (मकेंझी १८३३: ८३४) याच कामांतर्गत तो उत्कृष्ट सर्वेक्षक झाला असला, तरी आज इतिहासकारांमध्ये त्याची ओळख इतिहासाचा उपासक व संग्राहक म्हणून आहे. मकेंझीने जीव पणाला लावून दाक्षिणात्य भाषांतले साहित्य अपूर्व पातळीवर गोळा केले, आणि दक्षिणेच्या सर्वांगीण इतिहासासाठी एक प्रचंड दस्तऐवज तयार केले. तत्कालीन प्राच्यपंडितांना अभिजात संस्कृत व फारसी-अरबी साहित्यात, आणि पुरातन भारतीय इतिहासात रस होता. पण मकेंझीने तत्कालीन प्रादेशिक भाषा, व तत्कालीन स्थानिक संस्थाने, समाज, संस्कृती व इतिहासावर भर दिला, आणि एकूण सहा भाषा व निरनिराळ्या लिपीत हजारो हस्तलिखिते व वस्तू संग्रहित केल्या. त्यात "साहित्य" असे वर्गीकरण केलेल्या हस्तलिखितांची गणना अशी : संस्कृत भाषेत ६६७ (नऊ वेगवेगळ्या लिपींत), २३१ कन्नड, २७४ तमिळ, १७६ तेलुगु, ६ मलयाळम, २३ उडिया, ११४ फारसी/अरबी/उर्दू (नस्तालीक लिपी), २० हिंदी (नागरी लिपी), ३७ जावानी (१८११ साली एक वर्ष जावा या द्वीपावर असताना मकेंझीने गोळा केलेली), ६ बर्मन, आणि १६ मराठी भाषेतील हस्तलिखिते. "स्थानिक कथानक, इत्यादि" च्या सदराखाली एकूण २०७० हस्तलिखिते आहेत त्यातील ९५ मराठी (बहुतांश मोडी लिपीत) आहेत. या शिवाय ८०७६ तमिळ शिलालेख, २१५९ इंग्रजी भाषांतरित कागदपत्रे, ७९ आराखडे, २५५९ रेखाचित्रे, ६२१८ नाणी, १०६ चित्रे, आणि ४० "जुन्या वस्तू" याही संग्रहित झाल्या. एकाच व्यक्तीने, काहीशा हौशी पातळीवर, मोठा शोधकारखाना उभारून तयार केलेला बहुभाषिक व व्यापक संग्रह म्हणून "मकेंझी आर्काइव" अनन्यसाधारण आहे, व आजही मध्ययुगीन दक्षिण भारताच्या आधुनिक इतिहासाचा पायाच समजले जाते. गेल्या काही वर्षांत मकेंझी व त्याच्या कार्याच्या ऐतिहासिक महत्त्वावर बरेच नवीन संशोधन झाले आहे. मकेंझी च्या विश्वाचे रोचक, ताजे दृश्य उभे झाले आहे. त्यांची ओळख करून देण्यासाठी हा लेख योजिला आहे.

मकेंझीला भारतीय गणितशास्त्रात विशेष रस होता. मद्रास येथे आल्यावर स्थानिक ब्राह्मणांशी संपर्क साधून या विषयावर चर्चाविनिमय आणि संहिता गोळा करण्यास सुरूवात केली. यांच चर्चांतून गणितशास्त्रावरच नव्हे तर भारतीय इतिहासाबद्दलही बरीच सामग्री हाती लागू शकेल हे त्याच्या लवकरच लक्षात आले. व्यापक सर्वेक्षणात ऐतिहासिक माहितीचाही सहभाग महत्त्वाचा असायला हवा, या आग्रहाने ऐतिहासिक माहिती गोळा करावयास त्याने सुरुवात केली, व त्याचीच त्याला चटक लागली.

संग्रहणाची चटक:

जिंकलेल्या प्रदेशातील स्थानिक सरदारांकडून वंशावळ्या गोळा करणे हे काही नवीन नव्हते; जिकडे तिकडे प्रांत जिंकल्यावर कंपनी अधिकार्‍यांनी वतनदार हक्कांचा निकाल लावण्यास जमीनदारांकडून कैफियती टिपून घेतल्या. पण मकेंझीने फक्त वसूली व इनाम हक्कांसंबंधित माहिती शोधली नाही - कन्नड, मराठी, तमिळ व तेलुगु भाषिक कारकून नेमून, जी मिळेल ती माहिती गोळा करून कैफियत व बखरींद्वारा लिहून घेतली. त्याला राजकीय घडामोडींमध्ये प्रधानतः रस होता. पण "कुठे काय उपयोगाचे ठरेल सांगता येणार नाही" या व्यापक धोरणाखाली दक्षिणेतील राजकीय संस्था, सामाजिक आचार-विचार, साहित्यप्रकार, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम, वगैरेंवर ही माहिती गोळा केली. पवाडे, लोकगीते, आख्यान, असे विविध वाङ्मयप्रकार लिहून काढले. गद्य-पद्य हस्तलिखितांवरच अवलंबून न राहता, मकेंझीने शोधाची व्याप्ती वाढवून शिलालेखांच्या मजकूरांच्या नकला, नाणी, भूदृश्य, पोशाख, कृषीयंत्र, शिल्प, गड, दरबारदृश्य, इत्यादींची रेखाचित्रे, आणि अन्य जिन्नस संग्रहित केले. कंपनी वरिष्ठ या उद्योगाच्या वाढत्या खर्चाबाबत तक्रार करू लागता मकेंझीने सामग्री विकत घेण्यासाठी, आणि सहाय्यकांच्या पगार आणि प्रवासासाठी, स्वत:चे पैसे खर्च केले. १८१०-१८१५ या काळात म्हैसूरहून अखंड मद्रास इलाखा, मलबार, वर्‍हाड, आणि मुंबई इलाख्यापर्यंत त्याचे सहाय्यक ऐतिहासिक साधनांच्या शोधात फिरले.

मकेंझीला एकही भारतीय भाषा लिहीता-वाचता येत नसे, त्यामुळे त्याचे देशी सहाय्यकच त्याचे कान व डोळे होते. मुख्य सहाय्यक एकाच 'कवली वेंकट' नामक घराण्यातले पाच बंधू होते - बोरैया, लक्ष्मैया, रामस्वामी, नरसिंहलु, आणि सीतारामैया. आजच्या आंध्र प्रदेशाच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या एल्लोर गावाचे हे नियोगी ब्राह्मण असून मसुलीपटम येथे शिक्षण व नोकरीस आलेले होते. कवली वेंकट बोरैया हा वडील बंधू मकेंझीच्या कचेरीचा प्रमुख असून, सर्वत्र फिरून माहितगार लोकांची ओळख करून घेणे, माहिती आणि कागदपत्रांचा शोध घेऊन त्यांच्या उपयुक्ततेची चाचणी करणे, मुलाखती घेणे, इत्यादी कामे तो पाहत असे. तो तेलुगु खेरीज संस्कृत, इंग्रजी, कन्नड व मराठी जाणत होता, आणि या सर्व देशी भाषांतून इंग्रजीत भाषांतरे तो मकेंझीसाठी करत असे. शंभराहून जास्त सहाय्यक वेगवेगळ्या प्रांतातून नियमितपणे टिपण्या, पत्रे, गोषवारे, याद्या मद्रासला पाठवत.

१ | |