कर्नल मकेंझीचा ऐतिहासिक खजिना: एका दक्षिणी दस्तऐवजातले बहुभाषिक स्वर - २

रोचना

भाग २

मकेंझीची कलकत्त्याला बदली झाल्यावर हे काम अचानक बंद पडले. दस्तऐवज आणि कारखानाही त्याच्या सोबत कलकत्त्यास आले. सामग्रीची वर्णनात्मक सूची तयार करायचे काम सुरू झाले, पण वेळ, खर्च आणि कंपनीच्या उत्साहाअभावी ते जमले नाही. मकेंझीच्या मृ‍त्यूनंतर कंपनीने त्याच्या विधवेकडून संपूर्ण संग्रह १०,००० पाउंड देऊन विकत घेतले. कलकत्त्यात बाकी सर्व प्राच्यपंडितांना हे काम कंटाळवाणी वाटल्यामुळे या दस्तऐवजाची सूची करण्याची जबाबदारी शेवटी हॉरेस विल्सन या प्राच्यपंडिताने हाती घेतली. (विल्सन १८२८: १८) विल्सन ने याद्या केल्या खर्‍या, पण तो स्वत: कुठलीही दक्षिणी भाषा जाणत नव्हता. इंग्रजी गोषवारे त्याला अस्ताव्यस्त वाटले, आणि देशी सहाय्यकांनी केलेल्या कामाची त्याला चिडचिड झाली. या सर्व पसा‍र्‍‍याच्या साहित्यिक किंवा ऐतिहासिक उपयुक्तता आणि महत्त्वाबद्दल तो उदासीनच राहिला. फारसी अथवा संस्कृत न जाणणार्‍या देशी सहाय्यकांना त्याने कामावरून बरखास्त करून मद्रासला परत पाठवले. त्याच्या एकूण निरुत्साही प्रस्तावनेने या खजिन्याबद्दल इतिहासकारांमध्ये किंवा अधिकार्‍यांमध्ये फारसे कुतूहल निर्माण केले नाही. लक्ष्मैया व रामस्वामी या दोन्ही कवली वेंकट बंधूंनी कंपनीला काम चालू ठेवण्याच्या परवानगीसाठी अनेक याचिका पाठवल्या. एशियाटिक सोसायटीला सहाय्यासाठी लक्ष्मैयाने केलेली याचिका हेन्री प्रिन्सेप या प्राच्यपंडिताने "कोणता ही नेटिव्ह हे काम करूच शकणार नाही" म्हणून नकारली. (कोह्न १९९६: ८६) पुढे मद्रास-स्थित रेव्हरेंड विलियम टेलरने विल्सनचाच निरुत्साही कित्ता गिरविला. काही काळानंतर मूळ हस्तलिखिते आणि देशी भाषांतील मजकूर मद्रास च्या गव्हरमेंट ओरियेंटल मॅन्युस्क्रिप्ट्स लायब्ररी येथे ठेवण्यात आला. सर्व इंग्रजी कागदपत्रे लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीत ओरिएंटल व इंडिया ऑफिस कलेक्शन येथे हलविण्यात आले.

२०व्या शतकात इतिहासकारांनी या दस्तऐवजाचा आधुनिक इतिहास लिहीण्यासाठी मजकूरवजा उपयोग केला. त्यातील विशिष्ट कैफियतींच्या विश्वसनीयतेबद्दल चर्चा चालू राहिली. ब्रिटिश व आधुनिक भारतीय इतिहासकारांना या कथनकांमध्ये ऐतिहासिक जाणीवेची उणीवच भासली. त्या ऐतिहासिक ज्ञानाच्या दस्तऐवजेपेक्षा तिच्या अभावाचे प्रतीक होऊन बसल्या. संग्रहण व संग्राहकांची गोष्ट नाहिशी होऊन मजकूरमात्र इतिहासकारांसाठी उपलब्ध राहिला. पण गेल्या काही वर्षांत एका नवीन संशोधनप्रवाहाने या मकेंझीच्या विश्वाला पुन्हा पुढे आणून नवीन रूप दिले आहे.

माहितीसंपादन आणि ज्ञानविश्व:

२०व्या शतकात इतिहासकारांनी या दस्तऐवजाचा आधुनिक इतिहास लिहीण्यासाठी मजकूरवजा उपयोग केला. त्यातील विशिष्ट कैफियतींच्या विश्वसनीयतेबद्दल चर्चा चालू राहिली. ब्रिटिश व आधुनिक भारतीय इतिहासकारांना या कथनकांमध्ये ऐतिहासिक जाणीवेची उणीवच भासली. त्या ऐतिहासिक ज्ञानाच्या दस्तऐवजेपेक्षा तिच्या अभावाचे प्रतीक होऊन बसल्या. संग्रहण व संग्राहकांची गोष्ट नाहिशी होऊन मजकूरमात्र इतिहासकारांसाठी उपलब्ध राहिला. पण गेल्या काही वर्षांत एका नवीन संशोधनप्रवाहाने या मकेंझीच्या विश्वाला पुन्हा पुढे आणून नवीन रूप दिले आहे. हा संशोधनप्रवाह म्हणजे ब्रिटिश साम्राज्याने आपल्या वसाहतींमध्ये रुजू केलेल्या "ज्ञानविश्वा" चा अभ्यास. या प्रवाहातले संशोधन बरेच गुंतागुंतीचे आहे. पण थोडक्यात, या संशोधनेने ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेच्या मुळाशी असलेल्या अभूतपूर्व माहिती आणि ज्ञानसंपादनपद्धतींकडे लक्ष वेधले आहे. लष्करी व राजकीय घडामोडींसहित, या माहितीसंपादनपद्धतींतून तयार झालेल्या "ज्ञानविश्वा"द्वारे भारताचे खोलवार परिवर्तन झाले, असा या "वसाहतोत्तर" (post-colonial) विचारप्रवाहाचा केंद्रवर्ती तर्क आहे. परकीय, आणि पराभूत संस्कृतीला जाणून घेताना, साम्राज्यवादी शासनाने संपादन केलेल्या माहितीतील फक्त मजकूराकडेच नव्हे, तर तीत वापरलेल्या संज्ञा आणि शोधप्रकार, विविध ज्ञानशाखीय तर्क, स्फुट माहितीचे वर्गीकरण होऊन तिचे "ज्ञाना"त परिवर्तन, आणि एकूण वैचारिक चौकटींकडे लक्ष द्यायला हवे, असे आवर्जून सांगितले आहे. नवीन वैचारिक चौकटींतून तयार झालेल्या या "वासाहतिक" ज्ञानविश्वामुळे भारतीय समाजाला स्वत:च्या परंपरेची नव्याने, नव्या संकल्पनांतून, ओळख करवून दिली; पूर्वीच्या विचारविश्वांशी व परंपरांच्या आकलनाशी नाते मूलभूत रित्या तोडले गेले; आणि याच व्यापक प्रक्रीयेशी भारतात उगम पावलेल्या आधुनिकतेचे धागेदोरे गुंतले गेले आहेत, असा एकूण या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. [पहा तळटीप १]

या संदर्भात, इतिहासलेखन, आणि भारतीय परंपरेच्या शोधात मिळविलेल्या बहुविध आणि अफाट माहितीचे शास्त्रशुद्ध वर्गीकरण संशोधनाच्या केंद्रस्थानी आहे. याच व्यापक पार्श्वभूमीवर "मकेंझी आर्काईव" बद्दल संशोधकांनी नवे प्रश्न उभे केले. उदा : मकेंझीच्या ऐतिहासिक विचारांची तात्त्विक आणि राजकीय पार्श्वभूमी काय होती? माहिती पुरविणार्‍यांची एकूण संग्रहात कोणकोणती रेखाचित्रे उमटतात? स्थानिक सहाय्यकांबरोबर मकेंझीचे नाते व सत्तासंबंध नेमके काय होते? सहाय्यकांना, किंवा कैफियती रचणार्‍या, टिपून घेणार्‍यांना तो काय व कशा सूचना देत असे? या संवादात इतिहासबद्दलच्या परस्पर विचारांचा मेळ कितपत जमत असे? सहाय्यकांच्या ऐतिहासिक जाणीवेबद्दल काय अनुमान लागू शकतात? ठराविक सूचनांवर आधारितच स्थानिक इतिहास लिहीले गेले, का स्थानिक माहितगार लोकांनी आपल्याच प्रचलित पद्धतींप्रमाणे गतकालाचे निरूपण केले? असे असता, या कथानकांना परंपरागत एतिहासिक पद्धतीचे, व एका "अस्सल" भारतीय इतिहासपद्धतीचे उदाहरण मानावे, की नव्या माहितीविश्वाशी झालेल्या संपर्कातून तयार झालेली संकर पद्धत म्हणून? दक्षिणेच्या "खर्‍या" इतिहासाची आधुनिक दाक्षिणात्य व इतर भारतीयांना ओळख पटवून देण्यात, थोडक्यात, मकेंझी च्या शोधप्रकल्पाचे काय योगदान आहे?

कवली वेंकट बोरैयाच्या तपशीलवार रोजनिशीतून या उद्योगाच्या सामाजिक संदर्भाची सुंदर झलक मिळते, आणि देशी साहाय्यकांच्या विचारविश्वाचीही चाहूल लागते. माहिती मिळविण्याच्या, प्रवासाच्या योजना व टिपणांतून बोरैया हे काम बर्‍या प्रमाणात स्वत:चे डोके चालवून करत असे असे दिसते. म्हणजेच, ऐतिहासिक महत्त्व, रोचक माहिती, वगैरेंबद्दल त्याचे स्वतंत्रही काही विचार होते - गोषवार्‍यात तो अनेकदा स्वत:ची टिपणेही गोवत असे.

देशी माहितगारांचे विश्व:

या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, हस्तलिखितांसहित कचेरीच्या दैनंदिन कामकाजातून उत्पन्न झालेले कागदपत्र व पत्रव्यवहार इत्यादींचा संशोधकांनी इतिहासाचे साधन म्हणून मार्मिक वापर झाला आहे. मकेंझीचा उद्योग कंपनी शासनाला उपयुक्त माहिती देण्याच्या हेतूनेच सुरू झाला. कंपनी सरकार भारतात प्रगत सुव्यवस्था आणत असल्यावर त्याचा विश्वास होता. तत्कालीन दक्षिणेतल्या विलयावस्थेतून गतकालाच्या लोकस्मृती हरवून जाऊ नयेत, व म्हणून त्यांना लवकरात लवकर संग्रहित करणे या सुव्यवस्थेतच मोडते, असे त्याचे धोरण होते. प्रादेशिक भाषांमध्ये शास्त्रशुद्ध असा पाश्चात्य शैलीचा इतिहास नसावा हे तो जाणत होता, पण भारतीय संस्कृतीत एकूण इतिहासमीमांसा आणि इतिहासलेखनशास्त्र नाहीच ह्या प्रभावी साम्राज्यवादी विचाराशी तो सहमत नव्हता. उलट, स्थानिक कैफियतांशी, वंशावळींची ओळख वाढता, इतिहास निरनिराळ्या ललित कथानाकांचे स्वरूप घेऊ शकतो, आणि कथानकाच्या विश्लेषणातून, त्यातील बारीक-सारीक संकेतांतून, लिटररी फ्लरिशेस मधून राजकीय संदर्भाची चाहूल लागू शकते यावर त्याचा विश्वास होता. इतिहासलेखन एका रिक्त, नि:पक्षपाती वर्तुळात होत नसून सत्तेच्या देवघेवातून तयार झालेले असते, आणि या संघर्षाच्या पाउलखुणा कथानकातच ओळखता येतात, असे त्याचे - त्या काळातल्या इंग्रज विचारप्रवाहाच्या काहीसे विरुद्ध असे - मत होते. (डर्क्स २००१: ) मध्ययुगीन दक्षिणी ऐतिहासिक जाणीव व लेखन ललित व माहितीपर लेखनाचे विलक्षण मिश्रण होते, असेच आज तमिळ-तेलुगु संशोधकांचे सर्वसामान्य मत आहे (नारायण राव,इ. २००३). त्याचेच पूर्वसूर आपल्याला मकेंझीच्या मतांमध्ये ऐकू येतात. अन्य ब्रिटिश आधिकार्‍यांच्या लिखाणाप्रमाणे मकेंझीचे स्वत:चे लेखन, एक-दोन अपवाद वगळता, इंग्रजी भाषेत व इंग्रज वाचकांसाठी झाले नाही. इतिहाससंबंधी त्याची बहुतेक चर्चा त्याच्या देशी साहाय्यकांबरोबर घडली. साहाय्यकांना निव्वळ खबर्‍यांचा दर्जा देऊन स्वत: "ज्ञाना"ची निर्मिती करण्याचा दावा त्याने केला नाही. स्वत: कोणते ही मोठे इतिहासवजा लेखन न करणारा साम्राज्यवादी, लष्करी-शासकीय सर्वेक्षक, दक्षिण भारताच्या इतिहासाचा, लोकजीवनाचा व साहित्याचा मोठा उपासक ठरला.

कवली वेंकट बोरैयाच्या तपशीलवार रोजनिशीतून या उद्योगाच्या सामाजिक संदर्भाची सुंदर झलक मिळते, आणि देशी साहाय्यकांच्या विचारविश्वाचीही चाहूल लागते. माहिती मिळविण्याच्या, प्रवासाच्या योजना व टिपणांतून बोरैया हे काम बर्‍या प्रमाणात स्वत:चे डोके चालवून करत असे असे दिसते. म्हणजेच, ऐतिहासिक महत्त्व, रोचक माहिती, वगैरेंबद्दल त्याचे स्वतंत्रही काही विचार होते - गोषवार्‍यात तो अनेकदा स्वत:ची टिपणेही गोवत असे. दक्षिणेतील जैन संस्कृतीवर मकेंझीच्या एकमेव ऐतिहासिक लेखासाठी संशोधन व लेखाचा आराखडा बोरैयाने तयार करून दिला, हे लेखाच्या टिपणांवरून सिद्ध होते. बोरैयाने श्रीरंगपट्टण च्या लढाईवर काव्यात्मक इतिहास रचला होता अशी ही एक नोंद आहे. (कोह्न १९९६: ८२) खुद्द मकेंझीने अनेकदा एकूण उद्योगासाठी बोरैयाचे महत्त्व नमूद केले होते. वेगवेगळ्या घटनांचा कालानुक्रम ठरवणे, व महत्त्वाच्या घटनांचे क्रमवार वर्गीकरण करण्यावरून मकेंझी व बोरैयामध्ये बरीच चर्चा झालेली दिसते. एरवी, इंग्रज इतिहासकारांप्रमाणे "ऐतिहासिक" व "पौराणिक" कथानक वा माहितीमध्ये देशी साहाय्यक फरक करत नसत - उपयुक्ततेच्या, विश्वसनीयतेबद्दलच्या त्यांच्या व्याख्याही निराळ्या होत्या. पण मकेंझीच्या प्रश्नांमुळे - खासकरून कालानुक्रमतेबद्दल, व सत्यासत्याच्या विषयाबद्दल साहाय्यकांच्या दृष्टीकोनातही खोलवार बदल झाला.

स्थानिक ब्राह्मणांमध्ये, माहीतगार लोकांमध्ये मकेंझीच्या उद्देशाबद्दलच्या शंका दूर करणे हे कामही बोरैया करत असे. बाकी शोधकर्‍यांचे कामही जिकिरीचे होते. अनेक ठिकाणी लोक त्यांच्याशी बोलावयास तयार नसत. जमीन, हक्क इत्यादी गमावलेल्या अनेकांना कंपनीच्या माहिती-मोहिमेचा चटका बसला होता, आणि "केवळ" ज्ञानापोटी हे जिज्ञासू येतात यावर लोकांचा संशय होता. कवली वेंकट घराण्याचे व नियोगी ब्राह्मणांचे नेटवर्क कुशलतेने वापरावे लागे, कधी स्थानिक कलेक्टरचे पत्र वा धमकी उपयोगी पडत, तर कधी सरळसरळ रुपये. मंदिरावरचे शिलालेख टिपून घेत असताना एकाला तेथून राजाच्या शिपायांनी पळवून लावले, तर नारायण राव नामक शोधकर्‍याला रायचूरनजीक गडवालच्या राजाने आदराने पान-सुपारी देऊन, मकेंझीचे पत्र घेऊन, वाचून, थेट राज्याच्या सीमेवर शिपायांसकट पोहोचवले! नारायण रावही हार मानून बसला नाही - एका ओळखीच्या स्थानिक माणसाचा नातेवाइक गडवालच्या दरबारात नोकरीला होता, त्याला गाठून, चांगली रकम देऊ करून त्याने हवी ती माहिती मिळविलीच. (वॅगनर २००३: ७९३)

कलकत्त्याहून परतल्यावरही कवली वेंकट बंधू उत्साही आणि उद्योगी होते. त्यांच्या वैयक्तिक याचिका फेटाळल्या गेल्या, पण लक्ष्मैयाने आर्थिक मदत मागायची पद्धत बदलली. मद्रास हिंदू लिटररी संस्था स्थापन करून एतद्देशियांमध्ये इतिहास व विज्ञानप्रेम जागृत करण्यासाठी त्याने आर्थिक सहाय्य यशस्वी रित्या मिळविले. शेवटी मद्रासच्या एशियाटिक सोसायटीचा तो पहिला नेटिव्ह सभासद झाला. रामस्वामीने पुढे स्वत: इंग्रजीत, पाश्चात्य शैलीत इतिहास लिहीले, लिटररी सोसायटीत त्यानेही प्रवेश मिळविला, आणि तेलुगु साहित्यावर संशोधनात्मक लेखन केले. इंग्रजी रोमँटिक कवींचा अभ्यास रामस्वामीने केला होता, व तेलुगु कवींच्या चरित्रात्मक अभ्यासात त्याची छाप दिसते, पण त्याचे कथानक मात्र जुन्या तेलुगु आख्यानवजा राहिले. दोन विचारविश्वाच्या विलक्षण मिश्रणातून रामस्वामीचे विचार व लेखन तयार झाले, पण स्वत:चे लेखन जुन्या शैलीतले नसून, शास्त्रशुद्ध व आधुनिक पद्धतीचेच आहे, हे त्याने आवर्जून सांगू पाहिले. (मंतना २००९)

| २ |