उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई - १

प्रियाली

वसई जवळचं सोपारा बंदर सम्राट अशोकाच्या पूर्वीपासून प्रसिद्ध होते, भरभराटीला आलेले होते तरी कालांतराने वसईचा परिसर राजकीय दृष्ट्या किंचित उपेक्षित झाला. अनेक वर्षांनी तिचा चेहरामोहरा बदलला तो पोर्तुगीजांनी तेथे वस्ती केल्यापासून. वसे असे मूळ नाव असणाऱ्या या प्रदेशाला पोर्तुगीजांनी बसैं (Bacaim) म्हणायला सुरुवात केली, पुढे इंग्रजांनी बसैंचे बसीन (Bassien) केले आणि त्यानंतर आता सद्यकाळी वसई या नावाने या शहराला ओळखले जाते.

 
भाग १

भारतातील पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीज वसाहतींचा विचार केला तर सर्वप्रथम आठवतो तो गोवा. भारत स्वतंत्र झाल्यावरही काही काळ पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिलेला, पोर्तुगीज संस्कृती जोपासलेला आणि त्याचवेळेस पोर्तुगीज अंमलाखाली दबलेला गोवा. परंतु खुद्द महाराष्ट्रातील, मुंबईच्या अगदी जवळची वसईची पोर्तुगीज वसाहत त्यामानाने चटकन लक्षात येत नाही. ती आजही उपेक्षित राहिल्यासारखी वाटते.


वसईच्या किल्ल्याचा नकाशा

वसईचा इतिहास एखाद्या पक्क्या वसईकराला विचाराल तर अगदी अभिमानाने आणि प्रेमाने तो तुम्हाला माहिती देईल आणि ही माहिती देण्यात कोणत्याही धर्माची वा जातीची व्यक्ती मागे नसेल याची खात्री अगदी छातीठोकपणे देता येईल. अर्थातच, माहिती देण्याची प्रत्येकाची आवृत्ती वेगवेगळी असेल. पुरातन काळापासून सोपारा बंदरामुळे विविध देशांतील, धर्मांतील लोकांचा वावर या परिसरात राहिला आहे आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आला आहे. ब्राह्मण, सारस्वत, सामवेदी, सोमवंशी क्षत्रिय, आगरी, आदिवासी, ख्रिश्चन, मुसलमान आणि अगदी आफ्रिकेहून गुलाम म्हणून आणलेले हबशी अशा अनेक संस्कृती आजही येथे नांदतात. पूर्वापार काळापासून असलेली सुपीक माती, मासेमारी आणि सोबतीला लाकडाचे आणि चामड्याचे उद्योग यामुळे सुबत्ता मिळवलेल्या या प्रदेशात नानाविध लोक वस्तीला येऊन राहिल्याचे आणि कायमचे वसईकर झाल्याचे इतिहासात डोकावल्यास दिसते.

वसई जवळचं सोपारा बंदर सम्राट अशोकाच्या पूर्वीपासून प्रसिद्ध होते, भरभराटीला आलेले होते तरी कालांतराने वसईचा परिसर राजकीय दृष्ट्या किंचित उपेक्षित झाला. अनेक वर्षांनी तिचा चेहरामोहरा बदलला तो पोर्तुगीजांनी तेथे वस्ती केल्यापासून. वसे असे मूळ नाव असणाऱ्या या प्रदेशाला पोर्तुगीजांनी बसैं (Bacaim) म्हणायला सुरुवात केली, पुढे इंग्रजांनी बसैंचे बसीन (Bassien) केले आणि त्यानंतर आता सद्यकाळी वसई या नावाने या शहराला ओळखले जाते. इतिहासातील; मुख्यत: मराठेशाहीतील काही महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार वसई राहिलेली आहे. पोर्तुगीजांपासून पुढे घडलेल्या इतिहासाचा आणि वसईच्या किल्ल्याचा थोडक्यात लेखाजोखा येथे घेतला आहे.

१६ व्या शतकात वसई आणि आजूबाजूचा प्रदेश गुजरातचा सुलतान कुतुबउद्दीन बहादुरशहाकडे होता. मुख्य राज्य गुजरातेत असल्याने त्याच्या काळातही हा प्रदेश उपेक्षितच राहिला. उलट लुटालूट, जाळपोळ, देवस्थानांना इजा पोहोचवणे वगैरे प्रकारांनी त्याने स्थानिकांना जेरीस आणले होते. याच सुमारास पोर्तुगीज दीव-दमण पासून गोव्यापर्यंत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत होते. बहादुरशहाला शह देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसईला दोन वेळा आग लावल्याचे कळते. गावांवर हल्ले करणे, लुटालूट करणे वगैरे प्रकार पोर्तुगीज आपल्या जहाजातून करत. “ज्याचं राज्य, त्याचाच धर्म” या उक्तीप्रमाणे देवळांवर बांधलेल्या मशीदींना तोडून तेथे चर्च उभे करण्याचा सपाटा पोर्तुगीजांनी लावला होता. जमिनीवरून मुघलांशी लढा आणि समुद्रावरून पोर्तुगीजांशी लढा, यांत बहादूरशहा जेरीस आला.

१५३४ मध्ये बहादूरशहाने नुनो डा’कुन्हा या पोर्तुगीज गवर्नरशी तह करून वसई, साष्टी, वरळी, कुलाबा, दीव-दमण, कल्याण, ठाणे, चौल हा सर्व प्रदेश पोर्तुगीजांना देऊन टाकला. अशा रीतीने, उत्तर कोकणावर पोर्तुगीजांचा अंमल आला. याच सुमारास वसईचा किल्ला बांधायला पोर्तुगीजांनी सुरुवात केली. तत्पूर्वी बहादूरशहाने आणि त्याच्या सुभेदाराने किनार्‍यानजीक उभारलेली तटबंदी आणि दुर्ग अस्तित्वात होते. वसईच्या किल्ल्याची माहिती लेखात पुढे बघू.


वसईच्या किल्ल्याचा दरवाजा

या काळात पोर्तुगीजांनी स्थानिक लोकांवर अनन्वित अन्याय केले. विहिरीत पाव किंवा गोमांस टाकून लोकांना बाटवण्याचे प्रकार केले. हिंदू मंदिरे तोडून तेथे चर्चेस उभी केली. जाळपोळ करणे, जमिनी हिसकावणे इ. प्रकार होत. एका पोर्तुगीज प्रवाशाच्या वर्णनानुसार हिंदू देवतांच्या मूर्ती जाळणे, त्यांची तोडफोड करणे नित्याचे होते. ज्या ठिकाणी हिंदू स्नानासाठी, धार्मिक विधींसाठी किंवा पापविमोचनासाठी जात असा तलाव पोर्तुगीजांनी नष्ट करून टाकला. या छळाला कंटाळून हिंदू, मुसलमान आणि पारशी लोकांनी येथून स्थलांतर करून शहाजहानच्या मुघली राज्यात आसरा घेतला. १७२० मधील एका नोंदीनुसार वसई भागात ६०००० च्या आसपास लोकसंख्या होती आणि त्यातील बहुतांश बाटलेल्या ख्रिश्चनांची आणि युरोपीयांची होती.

पोर्तुगीजांनी लाकडाचा आणि बांधकामासाठी लागणार्‍या दगडांचा व्यापार भरभराटीस आणला. घरांसाठी, जहाजांसाठी लागणारी उत्कृष्ट लाकडे आणि बांधकामासाठी तासलेले दगड यांची मोठी निर्यात वसईतून चाले. तत्कालीन पोर्तुगीज प्रवाशाने लिहिलेल्या नोंदीनुसार गोव्यातील अनेक चर्चच्या बांधकामांसाठी वसईतून दगड आणि दगडी खांब नेण्यात आले होते. व्यापारीदृष्ट्या हा वसईतील भरभराटीचा काळ असला तरी स्थानिक जनता अन्यायाखाली दबली जात होती. स्थानिक हिंदू आणि मुसलमानांना जुलमाने बाटवणे, त्यांना त्रास देणे, मूर्तींची आणि प्रार्थनास्थळांची तोडफोड करणे यांत पोर्तुगीजांची धर्मसत्ता इतकी उन्मत्त झाली होती की पुढे तिचा त्रास पोर्तुगीज अधिकार्‍यांना आणि राजसत्तेला होऊ लागला; कारण विविध कामांसाठी त्यांना स्थानिकांची गरज होती, मदत हवी होती, ती लोक वसई सोडून जाऊ लागल्याने मिळेनाशी झाली. अधिकार्‍यांनी याबाबत पोर्तुगीज राजसत्तेकडे केलेल्या तक्रारींच्या नोंदी मिळतात.

शिवाजी महाराजांचे लक्ष या जुलमांच्या बातम्यांनी वसईकडे वेधले होते. त्यांनी वसईवर कडक चौथाई लावली होती. पुढे पेशव्यांच्या डोळ्यातही वसई आणि वसईतील अत्याचार खुपत होतेच, पण प्रत्यक्ष कार्यवाही होत नव्हती. शेवटी अणजूरकर नाईकांनी "वसईप्रांत फिरंगीयांकडे आहे. त्याणें देवस्थानें व तीर्थे यांचा व महाराष्ट्रधर्म यांचा लोप केला. हिंदू लोक भ्रष्टाऊन क्षार केले. म्हणून साहेबी मसलत करून प्रांत मजकूर सर करून देवस्थापना करावी व स्वधर्मस्थापना होय ते गोष्टी करावी.” अशी तक्रार पहिल्या बाजीरावाकडे केली. या तक्रारीला यश येऊन वसईवर स्वारी करण्याचा बेत नक्की झाला.

१ |