खरे लक्ष्मीपूजन

अरुंधती कुलकर्णी

गेली अनेक शतके, सहस्त्रके भारतात परंपरेनुसार दिवाळीला लक्ष्मीपूजन करण्यात येते. कोट्यवधी भारतीय लोक दीपावलीला दिव्यांची आरास करून मोठ्या श्रद्धेने व थाटामाटात लक्ष्मीची पूजा करतात. वर्षात इतर सणावारांना दुर्गा देवी, सरस्वती यांचीही पूजा होते. ज्ञान, समृद्धी, स्थैर्य व वीरतेची ही पूजा असते. स्त्रीच्या ठायी या सर्व शक्ती वास करतात असाही समज भारतात रूढ आहे. परंतु हे सर्व करताना घरातील व समाजातील स्त्रीला मिळणारी दुय्यम दर्जाची विपरीत वागणूक हे विरोधी चित्र भारतात ठायीठायी दिसते.

एखाद्या देशाची प्रगती जर मोजायची झाली तर फक्त त्या देशाचे आर्थिक - औद्योगिक वा संरक्षण क्षेत्रातील काम पाहता उपयोगाचे नाही. त्या देशात शिक्षण, आरोग्य, मूलभूत सुविधा, जन्म-मृत्यू दर, व्यावसायिक संधी यांचे प्रमाण टक्केवारी पाहून मगच तो देश प्रगत म्हणावा वा नाही हे ठरविले जाऊ शकते. भारतात सध्या प्रगतीची घोडदौड चालू आहे असे म्हटले जाते. परंतु हे चित्र कितपत खरे व किती फसवे हे पाहावयास गेले तर स्तंभित करणारे वास्तव सामोरे येते.

गेली अनेक शतके, सहस्त्रके भारतात परंपरेनुसार दिवाळीला लक्ष्मीपूजन करण्यात येते. कोट्यवधी भारतीय लोक दीपावलीला दिव्यांची आरास करून मोठ्या श्रद्धेने व थाटामाटात लक्ष्मीची पूजा करतात. वर्षात इतर सणावारांना दुर्गा देवी, सरस्वती यांचीही पूजा होते. ज्ञान, समृद्धी, स्थैर्य व वीरतेची ही पूजा असते. स्त्रीच्या ठायी या सर्व शक्ती वास करतात असाही समज भारतात रूढ आहे. परंतु हे सर्व करताना घरातील व समाजातील स्त्रीला मिळणारी दुय्यम दर्जाची विपरीत वागणूक हे विरोधी चित्र भारतात ठायीठायी दिसते.

जगात लिंगभेद हा नवा नाही. गेली अनेक शतके तो चांगला मुरलेला, रुजलेला असून त्याची पाळेमुळे किती खोलवर गेली आहेत याचा अंदाजच बांधणे कठीण आहे. रशिया असो वा मोरोक्को, चीन असो वा अमेरिका, भारत असो वा जपान.... जगाच्या कानाकोपर्‍यांत हा लिंगभेद त्या त्या समाजाचा व विचारसरणीचा एक अविभाज्य भाग बनून राहिला आहे. नव्या संसाधनांनी, आचार-विचार-सुधारणा-तंत्रज्ञानाने त्या परिस्थितीत फरक पडायला हवा असे म्हटले तरी चित्र खरोखरी तितके चांगले अथवा आशादायी दिसत आहे का?

मुळात लिंगभेद ह्या शब्दाला बरेच पैलू व स्तर आहेत. स्त्री व पुरुष यांच्यात फरक करणे व तो फरक जोपासणे म्हणजे लिंगभेद इतके ते साधेसुधे उरलेले नाही. या फरक करण्याच्या मनोवृत्तीचे पडसाद कसे, कोणत्या पद्धतीने दिसून येतात यांचा हा थोडक्यात धांडोळा :

१. जन्मण्याचा हक्क : स्त्रियांना अनेकदा जन्मण्याच्या हक्कापासून वंचित राहावे लागते. सध्या भारतातील स्त्री:पुरुष टक्केवारी पाहिली तर किती स्त्रियांची भ्रूणावस्थेतच नामोनिशाण मिटवले जाते याची कल्पना येईल. मात्र हे चित्र फक्त भारतापुरतेच नव्हे तर जगातील अनेक देशांसाठी लागू आहे. स्त्री गर्भ राहू नये यासाठीचे उपाय, स्त्री गर्भ राहिल्यास तो नष्ट करणे, स्त्री जन्माला आल्यास तिच्या गळ्याला नख लावणे यांचा यात समावेश होतो. आकडेवारी सांगते की, भारतात १ ते ५ वर्षाच्या वयातील किमान १ लाख ३२ हजार मुली दरवर्षी लिंगभेदाच्या कारणामुळे मृत्युमुखी पडतात. आज भारतात १००० पुरुषांमागे केवळ ९३३ स्त्रिया जन्म घेऊ शकतात.

२. मृत्यूचे प्रमाण : आफ्रिका व आशियातील अनेक देशांमध्ये स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. स्त्रियांना पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. तसेच कुपोषण, अपुरी वैद्यकीय मदत, स्त्रियांची हिंसा अशा कारणांमुळे आजही स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात मृत्युमुखी पडतात. मुलगी जन्माला आल्यावर तिच्याकडे दुर्लक्ष करणे, तिला सोडून देणे, मुलगी झाल्यावर आईला नैराश्याचे झटके येणे, तिने आत्महत्या करणे हेही प्रमाण जास्त दिसते. जगातील एकूण लापता किंवा हरविलेल्या महिलांमधील तब्बल ८० टक्के महिला या भारत व चीनमधील आहेत!!

३. मूलभूत सोयींचा अभाव : शिक्षणासारख्या अतिशय मूलभूत गोष्टीपासून वेगवेगळ्या कारणांमुळे आजही स्त्रियांना मुकावे लागते. आकडेवारीनुसार भारतात ७५ टक्के पुरुष तर फक्त ५४ टक्के स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळते. भारतासारख्या देशात मुली लहान वयातच धाकट्या भावंडांचे पालनपोषण, घरकाम, मोलमजुरी, दूरच्या ठिकाणाहून पाणी भरणे अशा कारणांमुळे शाळा व शिक्षणापासून पारख्या राहतात. शाळेत जायचे तरी शाळा लांब अंतरावर असणे, त्यासाठी चालत जायला लागणे, सुरक्षित वातावरणाचा अभाव, स्वच्छतागृहांची कमतरता, स्त्री शिक्षिकांची संख्या कमी असणे या कारणांशिवाय घरात मुलीला परकी, खालच्या दर्जाची वागणूक व तिच्या शिक्षणाबद्दलची उदासीनता या सर्व कारणांचा त्यात मोठा हात आहे.

४. सुसंधीची कमतरता : स्त्रियांच्या प्रगतीच्या आड येणारा आणखी एक अडसर म्हणजे त्यांना अनेक क्षेत्रांमध्ये पुरेसा वाव न मिळणे, संधीचा अभाव असणे. तसेच प्राथमिक - माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध नसणे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्त्रिया आज चमकत असल्या तरी त्या क्षेत्रात त्यांना पुरेशी संधी आहे का, तसे पूरक वातावरण आहे का याबद्दल पाहू गेल्यास आढळेल की त्या क्षेत्रात आजही त्यांना म्हणाव्या तितक्या संधी उपलब्ध नाहीत. किंवा बढतीला, त्या क्षेत्रातील उत्तमोत्तम सुसंधीना त्यांना वाव नाही. सैन्य, राजकारण, वाणिज्य - अर्थकारण, खेळ इत्यादी अनेक क्षेत्रात स्त्रिया आपला ठसा उमटवत असल्या तरी त्यांची संख्या तुरळक आहे.

५. व्यावसायिक स्तरावर लिंगभेद : नोकरी, बढती, व्यवसायाच्या क्षेत्रात सामोरा येणारा लिंगभेदही गंभीर स्वरूपाचा आहे. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी स्त्रियांसाठी अपुर्‍या स्वच्छता सुविधा व मूलभूत सुविधा, त्याच दर्जाच्या कामाला /पदाला इतर पुरुष सहकार्‍यांपेक्षा कमी पगार, बढतीच्या संधी नाकारल्या जाणे, शोषण, निम्नस्तरीय वागणूक, चारित्र्यहनन यांसारख्या गोष्टी अर्थार्जन करणार्‍या स्त्रियांना सहन कराव्या लागतात.

६. मालकी हक्काबाबत असमानता : स्त्रियांच्या नावे जमीन-जुमला, घर, इस्टेट करण्याची तयारी नसल्यामुळे, त्यांचा हक्क डावलण्याच्या प्रथेमुळे आजही स्त्रियांच्या नावे केलेल्या, त्यांच्या मालकीच्या इस्टेटी, जमिनी, घरे, उद्योग-व्यवसाय कमीच दिसून येतात. त्याचा परिणाम असा होतो की वाणिज्य क्षेत्रात, व्यापार-उदीम, आर्थिक घडामोडींच्या क्षेत्रात स्त्रीचा आवाजच दबला जातो. पुरुषाला (केवळ तो पुरुष लिंगाचा असल्यामुळे) मिळालेले मालकी हक्क स्त्रीला न मिळाल्यामुळे ती या क्षेत्रात व पर्यायाने सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात कमी पडते. तिथे तिच्या अस्तित्वाचा ठसा उमटवण्यास तिला अडचणी येतात.

७. घरातील लिंगभेद : स्त्रियांना घरात निम्न दर्जाची वागणूक, त्यांचे आरोग्य - पोषण यांकडे दुर्लक्ष, शारीरिक - भावनिक - मानसिक शोषण, घरातील स्त्रीच्या एकटीच्या वाट्याला घरकाम - अर्थार्जन - मुलांचे पालन-पोषण यांची संमिश्र जबाबदारी यातूनही पूर्वापार चालत आलेला लिंगभेद सामोरा येतो. मुली जन्मल्यावर त्याबद्दल शोक करणे, घरातील स्त्रिया- मुलींना घराच्या चार भिंतींत ठेवणे, त्यांना संकोची-लाजाळू बनण्यास प्रवृत्त करणे, त्यांच्या आरोग्य, शारीरिक समर्थतेकडे दुर्लक्ष, घरातील मुलांना चांगल्या दर्जाचे अन्न देणे, मुलींना शिळे - उरलेले अन्न देणे, मुलांना अगोदर जेवायला देणे, मुलींना सर्वात शेवटी जेवायला देणे, मुलाच्या आजारपणात वैद्यकीय उपचार - औषधपाणी करणे, मुलीचे आजारपण घरगुती उपायांनी धकवून नेणे अशा अनेक तर्‍हांनी हा लिंगभेद आढळतो.

प्रथा-परंपरांचे हे वळसे इतके जबरदस्त असतात की स्त्रियाही अनेकदा या स्त्री-विरोधी वागणुकीचे समर्थन करताना दिसून येतात. पर्यायाने कुपोषित राहिलेल्या किंवा नाजूक तब्येतीच्या स्त्रिया/ मुली गर्भार अवस्थेत/ बाळंतपणानंतर येणार्‍या आजारांना बळी पडू शकतात. माता जर कुपोषित असतील तर अर्भकांचे जन्मतः वजनही कमी असू शकते, त्यांची प्रतिकारशक्ती कमी असू शकते, ती लवकर आजारी पडू शकतात, त्यांच्या अवयवांची वा मेंदूची वाढ खुंटलेली असू शकते व त्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर होऊ शकतो.

स्त्रियांप्रती हिंसाचार, कौटुंबिक हिंसा हे प्रमाणही बर्‍याच मोठ्या प्रमाणात आढळते. इतके, की २००२ साली घेतलेल्या कौटुंबिक स्वास्थ्याच्या राष्ट्रीय स्तरावरील एका सर्वेक्षणात ५६ टक्के स्त्रियांनी कौटुंबिक हिंसाचाराचे समर्थन केलेले आढळून आले! हुंडा, हुंड्यापायी छळ, हुंडाबळी हे प्रकारही समाजाच्या मानसिकतेत इतके घट्ट रुजले आहेत की त्यांची पाळेमुळे खणून त्यांना समूळ नष्ट करणे गरजेचे आहे.

भारतात कायदा, संविधान यांनी स्त्रीला समान दर्जा दिला आहे. तिचे हक्क अबाधित राहावेत, तिला वेळोवेळी सर्व सुविधा-सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी वेगवेगळ्या तरतुदी केल्या आहेत. परंतु या सर्व सोयी, तरतुदी प्रत्यक्षात उतरणेही तेवढेच गरजेचे आहे. आज संसदेत स्त्रियांसाठी ३३ टक्के आरक्षण असतानाही तिथे फक्त १० टक्केच स्त्रिया त्या जागा भरू शकल्या आहेत. स्त्रियांना स्वतःचे मूलभूत हक्क, अधिकार व जबाबदारी यांची जाणीव होणे हेही महत्त्वाचे आहे.

भारतातील सुशिक्षित समाजातही आजच्या घडीला एकट्या स्त्रियांना कर्जे नाकारली जातात. बाहेरच्या जगात कर्तृत्व गाजवणारी स्त्री जर घर सांभाळू शकत नसेल तर ती आजही अयशस्वी म्हणून मानली जाते. राजकीय स्तरावर पाहिले तर स्त्री राजकारण्यांनी केलेल्या चुकांचे जेवढे भांडवल केले जाते तेवढे पुरुष राजकारण्यांच्या त्याहीपेक्षा गंभीर चुकांचे केले जात नाही. स्त्रीची प्रतिमा म्हणजे फक्त पत्नी, माता व कन्या या भूमिकांमध्येच बंदिस्त राहते व तीच प्रतिमा प्रसारमाध्यमांतून वारंवार पुढे येत राहते आणि जनमानसांत ठसत जाते.

समाजातील स्त्रियांबद्दलची, स्त्री-जन्माबद्दलची विचारधारा, आकस बदलणे अत्यावश्यक आहे. स्त्रीबद्दलची परंपरागत साचेबद्ध कल्पना, तिचे स्थान दुय्यम ठेवण्याची पराकाष्ठा हे सर्व संपुष्टात आले पाहिजे. स्त्रियांना घरी, समाजात, धर्मात, राजकारणात व संस्कृतीत, सर्वत्र दुय्यम दर्जाची वागणूक देणे व त्यांना त्याच दृष्टिकोनातून बघणे थांबवले गेले पाहिजे. बाईने जात्याच शालीन, विनम्र, क्षमाशील, संकोची, तडजोडीस तयार वगैरे असले पाहिजे हाही मोठा गैरसमज आहे. तसेच बायका प्रत्यक्ष निर्णय घेण्याचे वेळी कमकुवत ठरतात, कच खातात किंवा भावनिक होतात हा पूर्वग्रह दूर केला पाहिजे. अन्यथा केवळ दुर्गा- लक्ष्मी-सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून काहीही साध्य होणार नाही. घरातील स्त्रियांना समान वागणूक द्या. मुलगा व्हावा म्हणून व्रतवैकल्ये - नवस - उपासतापास करणार्‍या माता, नातू मिळाला नाही म्हणून सुनेचा छळ करणार्‍या सासवा भारतात कमी नाहीत. हे चित्र बदलले पाहिजे. स्त्रीला शिकवा, तिला समान संधी द्या, तिचे आरोग्य - शिक्षण - स्वास्थ्य उत्तम राखण्याची काळजी घ्या, तिच्या खांद्याला खांदा लावून काम करा, घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तिची साथ द्या, घरी वा समाजात तिची हेटाळणी होईल असे वागू नका, तिला सन्मानाने जगू द्या....त्यातून होणारी प्रगती ही खरी प्रगती असेल.

स्त्रियांना जगात सक्षम होण्यास सर्वतोपरी साहाय्य करणे, स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक पुरुषप्रधान विचारसरणीत बदल घडवून आणणे, स्त्रियांना समान वागणूक देणे ही लक्ष्मीची खरीखुरी पूजा असेल.

समाप्त.

( लेखिका कायदा पदवीधर असून सामाजिक कार्य व संबंधित उपक्रम यांत विशेष रुची राखते.)