ट्रॉय - सा रम्या नगरी आणि तिची कहाणी - ३

अरविंद कोल्हटकर

भाग ३

अथेन्सला पोहोचताच आपल्याला ट्रॉय सापडल्याचा दावा करणारी पत्रे सर्व जगभरच्या विद्वत्सभांना पाठवायला श्लीमनने सुरुवात केली. आपल्याला सापडलेल्या मौल्यवान वस्तु म्हणजे प्रायम राजाचाच खजिना आहे आणि ते दागिने इलियडमधल्या हेलनचेच आहेत असा प्रचार त्याने सुरू केला. आपली पत्नी सोफियाचे त्या दागिन्यामधील फोटोही त्याने काढून घेतले. ट्रॉय नगर सापडल्याच्या ह्या दाव्यामुळे श्लीमनला जगभर मोठी प्रसिद्धी मिळाली.


ऍगॅमेम्नॉनचा मुखवटा

ग्रीसमध्येही त्याला उत्खनन करावयाचे होतेच त्यासाठी परवाना मिळावा म्हणून तुर्की उत्खननातून मिळविलेल्या दागिन्यांचे प्रलोभन त्याने ग्रीक सरकारला दाखविले. त्यांच्या बदल्यात मायसीनी आणि ऑलिम्पिया येथे उत्खनन करण्याची त्याची मागणी होती पण तुर्की सरकारशी झगडा नको म्हणून ग्रीक सरकारने हे प्रलोभन नाकारले. मधल्या काळात कामात कुचराई दाखविल्याबद्दल अमीन एफेंडी तुरुंगात जाऊन पडला. पूर्वीच्या करारानुसार मिळालेल्या मौल्यवान साठयाचा अर्धा वाटा तुर्की सरकारने मागितला त्याला श्लीमनने चक्क नकार दिला. तुर्की सरकारने ग्रीक कोर्टात त्याच्याविरुद्ध दावा दाखल केला आणि कोर्टाने ५०,००० फ्रॅंक्स नुकसानभरपाईवर दावा तोडला. वस्तुत: सापडलेल्या चीजांचे मूल्य ह्यापेक्षा कितीतरी अधिक होते आणि श्लीमनला त्याची पूर्ण कल्पना होती.

श्लीमनने हुशारीने पत्ते टाकून ५०,००० ऐवजी २५०,०००ची रक्कम स्वखुशीने तुर्की सरकारला दिली. त्याने संतुष्ट होऊन तुर्की सरकार विरघळले आणि हिस्सार्लिकमध्ये नव्याने उत्खनन करण्याची अनुमती श्लीमनला मिळाली. त्याचबरोबर मायसीनी येथे उत्खनन करण्याची मुभाही ग्रीसकडून त्याला मिळाली. प्रथम त्याने ग्रीसमधले काम हाती घेतले आणि येथे त्याला सोन्याच्या मुखवटयांचे नवे घबाड मिळाले. त्यापैकी एकाला त्याने कपोलकल्पित असे ’ऍगॅमेम्नॉनचा मुखवटा’ हे नावही देऊन टाकले.


श्लीमनने बनविलेला ट्रॉय परिसराचा
नकाशा

१८७८ त तो परत ६व्या खेपेस ट्रॉयच्या उत्खननाकडे वळला. पण ह्या खेपेस तो एकटा नव्हता. अनेक उत्खननविशारद ह्या कामाच्या प्रसिद्धीमुळे आकृष्ट होऊन त्याला येऊन मिळाले होते आणि त्यामुळे उत्खननकार्य अधिक शास्त्रशुद्ध प्रकारे होऊ शकले. ह्या उत्खननात त्याला पुन: काही मौल्यवान वस्तु मिळाल्या पण एव्हाना तुर्की सरकार अधिक जागरुक झाले होते आणि त्यांपैकी फारच थोडे त्याच्या वाटयाला येऊन तुर्कस्तानबाहेर जाऊ शकले. बाकी सर्व वस्तु इस्तनबूलमधल्या पुरावस्तुसंग्रहालयामधे जमा झाल्या.
श्लीमनचे आता वय होऊ लागले होते. आयुष्याचे शेवटचे दिवस त्याने अथेन्समधल्या आपल्या घरात काढले. ट्रॉयला जगापुढे आणण्याच्या त्याच्या कार्यामुळे त्याला अनेक मान आणि विद्वत्क्षेत्रात प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. पुरातत्त्वशास्त्राचा पिता असेही काही लोक त्याला मानू लागले होते. नेपल्समध्ये १८९० साली त्याला मृत्यु आला. त्याचे शरीर अथेन्सला नेऊन त्याच्या इच्छेनुसार ऍक्रोपोलिससमोर दफन करण्यात आले. त्याची पत्नी आणि ट्रॉयमधली भागीदार सोफिया ही त्याच्यामागे अनेक वर्षे जगून १९३२ त वारली.

ट्रॉयचा पुढील प्रवास


ट्रॉयचे उत्खनन (विहंगमदृश्य)

तदनंतर अनेक पुरातत्त्वविशारदांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॉयचे उत्खनन तेव्हापासून आजपर्यंत अखंडपणे चालूच आहे. अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने ते केले जात असल्याने श्लीमनच्या धसमुसळया कामाचे अनेक दुष्परिणाम आता समोर आलेले आहेत. हिस्सर्लिकमधले अवशेष केवळ ट्रॉय नगराचेच आहेत असे नाही. ट्रॉयचा काळ इसवी सनापूर्वी १५०० ते १२०० मानला जातो पण हिस्सार्लिकमधली वस्ती त्यापूर्वी १५०० वर्षे तेथे होती असे आता दिसून आले आहे. ब्रॉंझयुगाच्या प्रारंभापासून ते रोमन काळापर्यंत त्या जागी एक जुनी वस्ती गाडली जाऊन त्यावर नवी उभी राहिल्याचे एकूण ९ थर सध्याचे पुरातत्त्वविशारद तेथे मोजतात. होमरचे ट्रॉय नगर हे त्यातले सर्वात प्राचीन नाही. प्राचीनापासून मोजल्यास ते ७ वे ट्रॉय आहे अशी समजूत आहे. श्लीमनला सापडलेला तथाकथित प्रायमचा खजिना आणि हेलनचे दागिने वस्तुत: त्यांच्यापूर्वी १०००-१२०० वर्षांचे जुने असावेत आणि ते दुसर्‍या क्रमांकाच्या थरात होते म्हणजेच प्रायमच्या ट्रॉयच्या खाली खोलवर पुरलेले होते आणि प्रायम वा हेलनशी त्यांचा काडीमात्र संबंध नाही. पण ट्रॉय एके ट्रॉय असा ध्यास घेऊन अशास्त्रीय पद्धतीने खणाखणी केल्यामुळे ह्या कशाकडेच अडाणीपणामुळे लक्ष दिले गेले नाही आणि पुष्कळ दुवे जागीच नष्ट झाले, तसेच ह्या प्रायमच्या ट्रॉय नगराच्या आधीच्या जुन्या ट्रॉय नगरांचा अभ्यास करण्याची संधि कायमची नष्ट झाली असे विद्वानांचे मत आहे. लाभ झालाच असला तर तो एव्हढाच की ह्या खजिन्याच्या शोधामुळे श्लीमनच्या कार्याकडे जगाचे लक्ष वेधले गेले.

सर्वसामान्य प्रवासी आज ट्रॉयचे अवशेष बघायला जातॊ तेव्हा त्याला त्या उंचवटयावर अनेक पडक्या भिंती आणि अन्य बांधकामाचे नमुने दिसतात. जुन्या ओबडधोबड दगडांपासून ते रोमन काळातल्या संगमरवरी कोरीव कामापर्यंत असंख्य गॊष्टी पसरलेल्या दिसतात. वरकरणी त्या सगळ्य़ा एकासारख्या दिसतात पण विद्वान् त्यांच्यामध्ये ९ वेगवेगळे थर दाखवितात. माहितगार वाटाडया बरोबर असला तर हे गुंतागुंतीचे कोडे सोडविण्यास तो थोडी मदत करू शकतो.

प्रायमच्या खजिन्याचे रहस्य

तथाकथित ’प्रायमच्या खजिन्या’चे काय झाले ही एक मनोरंजक कहाणी आहे. १८८१ साली हा खजिना बर्लिनच्या सरकारी वस्तुसंग्रहालयाकडे पाठविण्यात आला. दुसर्‍या महायुद्धापर्यंत तो तेथेच होता. प्रत्यक्ष युद्धाच्या दिवसात तो बर्लिन प्राणिसंग्रहाखालच्या तळघरामध्ये सुरक्षिततेच्या कारणासाठी नेऊन ठेवण्यात आला होता. १९४५ त सोवियट रशियन सैन्य बर्लिनमध्ये पोहोचले तेव्हा हा खजिना तेथून काढून सोवियट रशियाला पाठविण्यात आला. सोवियट काळापर्यंत हा खजिना आपल्या ताब्यात आहे हेच मान्य करायला सोवियट सरकार तयार नव्हते पण सोवियट रशियाचे विघटन झाल्यावर हा खजिना मॉस्कोस्थित पूष्किन म्यूझियममध्ये आहे असे उघडकीस आले. तेव्हापासून रशिया, जर्मनी आणि तुर्कस्तान ह्या तीन देशांमध्ये ह्यावरून वाद चालू आहे. आपल्या शहरांचे जे नुकसान जर्मन सैन्याने केले त्याच्या भरपाईपोटी हा खजिना ताब्यात ठेवण्याचा आपला अधिकार आहे असा रशियाचा दावा आहे. प्रश्नाचे समाधानकारक उत्तर सध्यातरी दुरापास्त दिसते.

इस्तनबूल ते ट्रॉय

इस्तंबूलपासून ट्रॉय नगर ही एक दिवसाची आनंददायक सहल आहे. इस्तंबूलमधून सकाळी निघालेली बस डार्डनेल्सच्या पश्चिम किनार्‍याने प्रवास करत ४-५ तासात गॅलीपली (तुर्की नाव गेलिबोलु) ह्या पहिल्या महायुद्धातल्या प्रसिद्ध गावी पोहोचते. ऑस्ट्रलियन आणि न्यूझीलंडच्या सैनिकांचा ह्या मोहिमेत मोठा भाग होता त्यायोगे त्या देशांमधील प्रवासी मोठया संख्येने गॅलीपलीला भेट देतात. तेथून फेरीबोटीने डार्डनेल्स सामुद्रधुनीचे २-३ किलोमीटर १० मिनिटात ओलांडता येतात आणि आपण ’चनक्कले’ (Çanakkale) ह्या बर्‍यापैकी मोठया शरात पोहोचतो. तेथून प्रत्यक्ष ट्रॉय (तुर्की भाषेमध्ये ’त्रुवा’) गाडीने अर्ध्या तासाच्या अंतरावर दक्षिण दिशेकडे आहे. दोनतीन तास तेथे काढून ह्याच मार्गाने आपण रात्री ८-९ पर्यंत इस्तंबूलला परतू शकतो.

समाप्त.

| | ३