भाग २
भारतासंबंधीत काही उदाहरणे
काळाबाजार करणे, पावत्या न देणे (कर चुकवणे), भेसळ करणे, लाच घेणे/देणे, मतदान न करणे हे सर्व भ्रष्टाचाराचेच प्रकार झाले. त्याबद्दल इथे जास्त खोलात जाण्याची आवश्यकता नाही.
बाँब पेरायला मदत करणारे देशद्रोही असतातच, पण तोच प्रकार वेगळ्या स्वरुपात हळुहळू करणारेही असतात. राखीव जागांचे उदाहरण घ्या. आधी अनेक शतके जातव्यवस्थेमुळे पीडीत लोकांसाठी स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी काही दशकांकरता राखीव निर्माण केल्या गेल्या. त्या अजूनही आहेत, व वाढल्या आहेत. आधीची 'उच्च' जातींची अमानवी वागणूक पाहता प्रायश्चित्त म्हणुन त्या काही शतकेही चालायला हरकत नाही. दुर्दैवाने त्याचे बाजारीकरण झाले आहे, राजकारण झाले आहे, आणि मोबदला म्हणून त्याकडे न पाहिल्या जाता बदला म्हणून दोन्ही बाजू पाहताहेत. या दुरुपयोगामुळे पसरणारे विष देशाला पोखरते आहे. नियंत्रित आणि सुयोग्य स्वरुपात राखीव जागा लागू करुन डायरेक्ट स्वार्थाचे देशप्रेमाच्या स्वार्थाला शह देणे थांबवायला हवे.
दुसरे उदाहरण नद्यांमधील पाणी मिळवण्यावरुन आहे (उदा. दिल्ली, पंजाब, हरयाणामधे यमुनेच्या पाण्यावरुन तर कावेरीवरुन कर्नाटक व तमिळनाडू दरम्यान. कृष्णा-गोदावरी प्रकरणात महाराष्ट्राचापण हातभार होता). या बाबतीत प्रांतिक स्वार्थ देशस्वार्थावर मात करु पाहतो. राज्यांच्या नागरिकांना घालवण्यावरुनचे तंटे हे असेच. महाराष्ट्राचेच बोलायचे झाल्यास काही राजकीय पार्ट्यांमुळे मागे दक्षिण भारतातील लोकांना तर इतक्यात बिहार व उत्तरप्रदेशच्या लोकांना महाराष्ट्रात त्रास दिल्या गेला आहे.
धर्माचा अनाठायी स्वार्थही तसाच देशाला वेठीस धरतो. खरेतर देशाप्रमाणेच धर्माचेही: चुकुन/योगायोगाने आपण ज्या धर्मात जन्मलो त्याला सर्वात थोर मानून त्याच्यावर प्रेम करायचे (हे जनुकांपेक्षा जास्त मनुकांमुळे**). स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात राज्ये होती व त्या आधीचा काही शतकांचा इतिहास परकीय आक्रमणांचा. त्या आधीही अधुनमधून या ना त्या राज्यकर्त्याखाली (जो की शेजारीप्रदेशांवर आक्रमण करण्याइतका बलाढ्य होता) मोठा प्रांत एकत्र होत असे, पण सध्यासारखी देशाची संकल्पना नव्हती, निवडणुकी नव्हत्या, राज्यकर्त्यांना मुदती व बांधिलक्या नव्हत्या. सध्याचे बहुतांश भारतीय स्वतंत्र भारतात जन्मले आहेत, सर्व धर्मांना सारख्या वागणुकीचे स्वप्न दाखवणाऱ्या भारतात जन्मले आहेत. तरीही अधुनमधून अनेकांच्या धार्मिकतेची व भारतीयत्वाची टक्कर होत असते. मी भारतीय की हिंदू, मी भारतीय की मुसलमान असे संघर्ष सुरु असतात. या दोन तशा विरुद्ध नसलेल्या विचाराधारांच्या दरम्यानचा तणाव अजाणतेपणी अस्तित्वात येतो व नकळतपणे फोफावतो. हा प्रकार देशाच्या संघटनेला जास्तच शहनाक आहे.
काही राष्ट्रे मुस्लीम राष्ट्रे आहेत उदा. पाकिस्तानचा जन्मच त्या तत्वावर झाला. टर्की, मलेशीया सारख्या देशांमधे मात्र मुस्लीम बहुसंख्य असले तरी इतर धर्मीयांना देशघटनेविरुद्ध जाणार्या विचारांना कवटाळण्याची गरज सहसा भासत नाही.
भारताचा जन्म फाळणीतून झाला. मुस्लीम राष्ट्र हवे असलेले पाकिस्तानात गेले तर इतर भारतात राहिले. मुस्लीम धर्मानुसार 'उम्माह' हा देशापेक्षा श्रेष्ठ समजायचा असतो. त्यामुळे अधुनमधून त्या धर्माच्या काही लोकांना फूस लावण्यात विघटनवादी शक्ती सफल होतात. घटनेप्रमाणे सर्वांना समान लेखता आले तर असे होणे कठीण होईल. पण त्याबाबतीत राजकारण्यांकरवी आपण आपले हात बांधुन घेतले आहेत. याची दोन ठळक उदाहरणे म्हणजे
(१) अजुनही समान नागरी कायदा लागु न होणे, आणि (२) शाहबानो खटल्यानंतरच्या घटना.
न्यायकारण व धर्मकारण यांना विभाजित न ठेवल्याने विवाहसंस्था (जी की न्यायालयाची अखत्यारी असावी) ही एकसंध न होता विविध धर्मांप्रमाणे विभाजीत राहिली. शाहबानोने घटस्फोटानंतर पोटगीचा दावा जिंकला खरा, पण एक चांगला बदल घडवून आणायची संधी सोडून न्यायसंस्थेने फतवा काढला की तीला जरी पोटगी बहाल झाली तरी त्या निकालाचा फायदा इतर पीडीत व पराभूत घटस्फोटीत मुस्लीम महिला घेऊ शकणार नाहीत. मुस्लीम धर्म कर्मठ असल्याने त्यातील ज्या लोकांना हा विरोधाभास दिसतो, त्यांना त्याबद्दल उघडपणे बोलणे सोपे नसते. तसे जरी असले तरी कुठून तरी सुरुवात व्हायला हवी व ती जाणीव पसरायला हवी. सैनकी राजवटींना उलथवुन टाकता येते तर भारतासारख्या देशात उघडपणे समोर येणे तितकेसे कठीण नसावे. खास करुन जर त्यामुळे अनेकांचे, अनेक पिढ्यांचे भले होणार असेल तर. 'पहिले आप' म्हणत राहण्याची ही वेळ नव्हे. धर्मांधता अमान्य असलेले मुस्लिम पुढे आले नाही तर सर्व मुसलमान अतिरेकी व देशद्रोही असतात हा चुकीचा विचार पसरायला मदत होईल.
त्यामानाने हिंदू धर्म सोशिक समजल्या जातो. हिंदू धर्म सर्वसमावेशक आहे असे म्हणणारे अनेक असतात. पण त्या समावेशकतेला काही छोट्या का होईना अटी असतात (नाहीतर मशिदी न पाडल्या जात्या - मंदिरे भूतकाळात पाडली गेली असो वा नसो). दुर्दैवाने भारतीय राज्यघटनाही पुर्णपणे सेक्युलर नाही. याला कारणीभूत राज्यकर्तेच. अप्रत्यक्षरित्या ते धर्मांना राज्यघटनेत ढवळाढवळ करु देतात. जी थोडीफार सेक्युलर कलमे आहेत ती वापरायचा प्रयत्न करणार्यांना pseudo-secular म्हणायला हे लोक मागे-पुढे पहात नाहीत. दोष घटनेचा नाही तर घटनेला वाकवू पाहणाऱ्यांचा आहे आणि त्यांना तसे करु देणार्य आपलाही आहे. हे बदलवुन राष्ट्र बलाढ्य करण्याकरता जबाबदार लोकांना निवडून द्यायची जबाबदारी आपलीच आहे, त्यांना जाब विचारण्याची जबाबदारी आपलीच आहे. चुकीच्या बाबतीत सोशिक असायची गरज नाही, पण असोशिक बनतांना त्यामुळे मानवी हक्कांची पायामल्ली होणार नाही हे ही पाहणे महत्वाचे.
कृती
थोडक्यात काय तर सर्व स्वार्थ हे स्व अर्थीच असतात, पण काही स्व जास्त व्यापक असतात. कुटुंब, परिवार, धर्म, देश, मानवता ही जास्त समावेशक वर्तुळे आहेत. रोजच्या आचारांमधे हे विचार जाणीवपूर्वक आणल्यास अधिकाधिक पृथ्विवासीयांचे जीवन सुकर होऊ शकेल.
आसिमोव्हने ज्या प्रमाणे रोबोटीक्सचे इमल्यांप्रमाणे असलेले तीन नियम बनविले, तसेच स्वार्थाचे बनवायला हवे. रोबोटीक्सचे नियम आहेत(***):
(१) रोबो मानवाला सहेतुक इजा करणार नाही आणि काही न केल्याने इजा होऊ देणार नाही.
(२) मानवाने दिलेल्या आज्ञा रोबोने पाळाव्या जर त्यामुळे पहिल्या नियमाचे उल्लंघन होणार नसेल तर.
(३) रोबोने स्वत:चे अस्तीत्व जपावे जर त्यामुळे पाहिल्या किंवा दूसऱ्या नियमाचे उल्लंघन होणार नसेल तर.
स्वार्थाबाबत खालील नियम बनवता येतील:
(१) मानवाने मानवतेला हानी पोचेल असे काही करु नये, त्याचप्रमाणे निष्क्रीयतेमुळे हानी पोचू देऊ नये.
(२) मानवाने आपल्या देशाकरता (प्रांताकरता) व धर्माकरता (जातीकरता, श्रद्धास्थानाकरता, नास्तीकतेकरता, गटाकरता, भाषेकरता, संस्कृतिकरता) सर्व काही करावे, जर त्यामुळे पहिल्या नियमाला बाधा येणार नसेल तर.
(३) मानवाने स्वत:च्या/कुटुंबाच्या/आप्तांच्या भरभराटीसाठी सर्व करावे, जर त्यामुळे पहिल्या किंवा दूसऱ्या नियमाचे उल्लंघन होणार नसेल.
आपले केंद्र स्थान आपण आपल्या व्यतिरीक्त टप्प्याटप्याने वाढणारे बनविले तर पूर्ण मानवतेला त्याचा फायदा होईल. स्वत:, कुटुंब, परिसर, गाव, राज्य, देश, मानवता यातील राज्य व देश हे घटक कृत्रिम आहेत. देशावर प्रेम करायचेच असेल तर ते अख्ख्या देशावर करा. वरील नियमांप्रमाणे वागायचे झाल्यास प्रत्येकाने स्वत:बाबत ठरवायला हवे की
'मी आधी मानवतावादी मानव आहे. त्यानंतर(च) हिंदु/मुसलमान/नास्तिक/भारतीय/अमेरीकन इ. मग माझ्या कुटुंबाचा/गावचा/परिसराचा. व शेवटी स्व-वादी व्यक्ती आहे.'
संदर्भ -
* गौतम अधिकारी यांचे 'The Intolerant Indian' हे पुस्तक (हार्पर कॉलीन्स २०११)
** २०१० चा मायबोली दिवाळी अंकातील लेख: http://vishesh.maayboli.com/node/787
*** http://en.wikipedia.org/wiki/Runaround
समाप्त.
लेखक एक खगोलशास्त्रज्ञ आहेत. त्यांचे सर्व शिक्षण महाराष्ट्रात झाले. गेले तप महाराष्ट्राबाहेर आहेत, कॅलटेक (Caltech), पॅसॅडेना, कॅलीफोर्नीया येथे.
१ | २