संपादकीय

उपक्रम दिवाळी विशेषांकाचे यंदा चौथे वर्ष. हा अंक वाचकांसमोर ठेवताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे.

२०११ हे वर्ष अनेक अर्थांनी उल्लेखनीय ठरले आहे. बहुतेक सर्वच क्षेत्रांमध्ये प्रचंड उलथापालथ आणि काही क्षेत्रांत आमूलाग्र बदल आपण सर्वांनी पाहिले आहेत. व्यक्तिगत, सामाजिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अश्या विविध पातळ्यांवर आपण हे स्थित्यंतर पाहतो आहोत, अनुभवतो आहोत आणि कळत नकळत एका अभूतपूर्व कालखंडाचे साक्षीदार होत आहोत.

दिवसेंदिवस चिंताजनक होत चाललेली जागतिक अर्थव्यवस्था, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेले देश, कंपन्या, वाढती महागाई यामुळे जगभरात जागोजागी असंतोषाची धग पसरू लागली आहे. देशादेशांमधील वाढता व्यापार आणि वाढते परस्परावलंबित्व यामुळे एका देशाच्या अर्थव्यवस्थेचे परिणाम इतर देशांवर होत आहेत यात नवल नाही. विशेषतः विकसित देशांमध्ये अपरिचित असलेली जनआंदोलने, संप यामुळे या संकटाची सर्वव्यापकता अधोरेखित होते.

या वर्षी सामान्यजनांच्या उठावाचे आणखी एक रूप मध्यपूर्वेतील देशनिहाय क्रांतींच्या रूपात जगाने पाहिले. जनमताचा रेटा किती शक्तिशाली असू शकतो आणि भल्याभल्या हुकुमशहांना पायउतार होण्यास कसाभाग पाडू शकतो हे यानिमित्ताने दिसून आले. या क्रांतीची व्याप्ती वाढवण्यात आणि तीव्रता टिकवून ठेवण्यात 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळांनी मोलाची भूमिका बजावली.

भ्रष्टाचाराच्या विरोधात असेच एक जनआंदोलन भारताने पाहिले. कित्येक दशकांनंतर एका व्यापक जनहिताच्या मुद्द्यावर संपूर्ण देश एकत्र झालेला आपण पाहिला. या आंदोलनालाही नव्या तंत्रज्ञानाची मोलाची साथ मिळाली. वास्तविक पाहता या तंत्रज्ञानाशिवाय ही चळवळ देश-परदेश-व्यापी झालीच नसती. राजकारणात अपरिहार्य असलेल्या विवादास्पद गोष्टी बाजूला ठेऊन पाहिले तर यातून एक महत्त्वपूर्ण गोष्ट अधोरेखित होते. लोकांच्या मनात भ्रष्ट व्यवस्थेबद्दल, प्रतिकूल परिस्थितींबद्दल असंतोष आहे, आणि संधी, योग्य मंच मिळाल्यास लोक तो सकारात्मक/रचनात्मक मार्गाने व्यक्त करू शकतात आणि एकत्र येऊन एकूणच समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. गरज आहे ती अश्या लोकांना व्यासपीठ देण्याची आणि त्यांच्या सकारात्मक उर्जेला दिशा देण्याची.

आधुनिक तंत्रज्ञान आणि दळणवळणांच्या साधनांच्या फायद्यांबरोबरच त्यांचा संभाव्य तोटा म्हणजे विचार करण्याची शक्ती गमावून बसलेला; प्रत्येक व्यक्तीचे जे स्वतःचे असे वैशिष्ट्य असते ते हरवलेला बिनचेहर्‍यांचा समाज निर्माण होणे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने विशिष्ट प्रकारचाच विचार करण्याची, सांगितल्या जातील त्याच उपभोग्य वस्तू वापरण्याची जी बधिर मानसिकता रूढ होऊ पाहते आहे, तिचा सजगपणे प्रतिकार करणे आवश्यक आहे. रुळलेल्या वाटा सोडून नवीन मार्ग चोखाळणे, ह्या सार्‍या स्थित्यंतरांत गतानुगतिक होऊन राहण्याऐवजी आपापल्या कुवतीप्रमाणे बदल घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवणे हे ह्याच सजग जाणीवेचे भाग आहेत.

या बदलांचा वेग आणि व्यापकता इतकी आहे की सामान्य लोक या झपाट्यात दिशाहीन होऊन भरकटण्याचा धोका आहे. त्यामुळे स्थित्यंतराकडे पाहून हात-पाय गाळून बसणार्‍यांपेक्षा या स्थित्यंतराकडे आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन अधिकाधिक उन्नत, समृद्ध आणि अर्थपूर्ण करण्याची संधी म्हणून पाहणार्‍या लोकांची आवश्यकता आहे. तसेच व्यापक प्रमाणात तसा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आजच्या काळात यासाठी आंतरजालाहून प्रभावी माध्यम दुसरे कोणतेही नाही

उपक्रमच्या उद्दिष्टांमुळे, ध्येयधोरणांमुळे व्यक्तिगत आणि सामाजिक जाणिवा प्रगल्भ असलेले जालकरी आपसूकच उपक्रमकडे वळतात आणि विविध विषयांवर लेखन, चर्चा यामुळे विचारांचे आणि माहितीचे आदानप्रदान किती प्रभावीपणे होते हे आपण पाहतो आहोत.

यावर्षीचा दिवाळी विशेषांक उपक्रम सदस्यांच्या उत्स्फूर्त अश्या योगदानाने उपक्रमच्या लौकिकाला साजेसा असाच झाला आहे. या विशेषांकातील लेख वाचकांना निश्चितच दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण वाटतील, त्यांच्या ज्ञानात, माहितीत ते भर टाकतील आणि म्हणूनच त्यांना ते आवडतील असा आम्हाला विश्वास वाटतो.

उपक्रमाच्या सर्व सदस्यांना, वाचकांना, प्रियजनांना आणि हितचिंतकांना ही दिवाळी व येणारे नवीन वर्ष सुखसमाधानाचे, भरभराटीचे व समृद्धीचे जावो हीच सदिच्छा.

सूचना: प्रतिसाद देण्यासाठी सदस्यांनी ह्या दुव्यावर टिचकी द्यावी .